
घरफोडी करणारा चोरटा पेल्हारमध्ये अटकेत
नालासोपारा, ता. २७ (बातमीदार) : रात्रीच्या वेळी घरफोडी करून फरारी होणाऱ्या सराईत चोरट्याला पेल्हारमध्ये अटक करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. अटक आरोपीकडून ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अब्दुल रहेमान तहीर वडू असे अटक आरोपीचे नाव असून नालासोपारा पूर्व पेल्हार गावातील राहणारा आहे.
नालासोपारा पूर्व पेल्हार परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागील १५ नंबरच्या रिलायबल बिल्डिंगमध्ये २० मे च्या मध्यरात्री घरफोडी झाली होती. या घरफोडीचा पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने पेल्हारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत लब्दे यांनी घटनास्थळावर भेट देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले होते. गुन्हे प्रकटीकरणचे प्रभारी पोलिस निरीक्षक महेंद्र शेलार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील, पोलिस हवालदार योगेश देशमुख, प्रताप पाचूनदे, पोलिस अंमलदार बालाजी गायकवाड, सचिन बळीद, संदीप शेळके, मोहसीन दिवाण, किरण आव्हाड, रोशन पुरकर यांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना केले होते. घटनास्थळावरील सीसी टीव्ही, गुप्त बातमीदार यांची माहिती घेऊन या पथकाने पेल्हार विभागातूनच या आरोपीचा शोध घेऊन तपास केला असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.