
मढ परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
मालाड, ता. ३० (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील मढ येथे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचे दिसून येत आहे. येथे काही दिवसांपूर्वी दोन मुलांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पालिकेने येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशीह मागणी नागरिकांकडून होत आहे.
काही दिवसांपूर्वी मढ कोळीवाड्यात राहणारी सातवर्षीय राजवी कोळी घरातून बाहेर काही घेण्यासाठी गेली असता गल्लीत असलेल्या भटक्या कुत्र्याने तिच्या अंगावर धाव घेत तिचा चावा घेतला. या वेळी नागरिकांनी कुत्र्यांना तेथून हुसकावून लावले. त्यापूर्वी एक दिवस अगोदर मढ किनाऱ्यावर एक दहा वर्षाच्या मुलाचापण कुत्र्याने चावा घेतला होता. त्या वेळी तेथे उपस्थित ग्रामस्थ जॉनी जांभळे व इतरांनी त्या भटक्या कुत्र्यांपासून या मुलाला वाचवले त्यामुळे मोठी घटना टळली. दरम्यान सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे मढ परिसरात कुत्र्यांची दहशत पसरली आहे. ऑल इंडिया फिशरमेन्स काँग्रेसचे महासचिव संतोष कोळी यांनी याबाबत पालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.