
महिनाभरात ७१ तिकीट दलालांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ७१ दलालांना पकडण्यात पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. त्यांच्याकडून २६ लाखांची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी ही माहिती दिली.
अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशाला तिकीट उपलब्ध होत नाही. तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी दलालांकडून तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे केले जातात. इतर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी या दलालांकडून तिकीट घेतात. ही बाब निदर्शनास आल्याने पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी तिकीट दलालाविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. मे महिन्याच्या १ ते २७ तारखेदरम्यान आरपीएफने ७१ तिकीट दलालांवर ६३ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून २६ लाख ६१ हजार ३१० रुपयांची ई-तिकिटे जप्त केली.
ई-तिकीट आणि खिडकी तिकीट दलालांच्या विरोधात विशेष मोहिमेत अंधेरी येथे एका दलालाला अटक केली. तसेच साकीनाका परिसरात १५ मे रोजी अलीम खान या दलालाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १ लाख ३ हजार ९८५ किमतीची १४ जर्नी कम रिझर्व्हेशन तिकिटे जप्त करण्यात आली. त्याचा साथीदार अफजल नफीस खान यालाही ताब्यात घेण्यात आले.