
Mumbai Crime : सव्वा कोटी रुपयांमध्ये फ्लॅटची परस्पर खरेदी-विक्री; ७३ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची फसवणूक
अंधेरी - सव्वा कोटी रुपयांमध्ये फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करून रजिस्ट्रेशन न करता तोच फ्लॅट परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विक्री करून एका ७३ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी जयेश विनोद तन्ना या विकसकाला कांदिवली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यांत त्याची दोन मुले दीपक आणि विवेक तन्ना या दोघांना आरोपी दाखवण्यात आले आहे.
तक्रारदार महिला ही वयोवृद्ध असून ती तिच्या मुलीसोबत गोरेगाव परिसरात राहते. तिचा मुलगा व्यावसायिक असून तो त्याच्या कुटुंबीयांसोबत गोरेगाव येथे स्वतंत्र राहतो.
राहते घर लहान असल्याने तिला एक फ्लॅट खरेदी करायचा होता. सप्टेंबर २०१९ रोजी तिला गोरेगाव येथील सिद्धार्थनगर, कपिलवास्तू सहकारी सोसायटीमध्ये एक फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती समजली होती. ही इमारत साई-सिद्धी डेव्हलपर्सची होती.
याच इमारतीमध्ये त्यांच्या ३०१ क्रमांक फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध होता. फ्लॅटची पाहणी केल्यानंतर तिने तो फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. तिने जयेश आणि दीप तन्नाची भेट घेऊन फ्लॅट खरेदी-विक्रीची सविस्तर चर्चा केली होती. याच चर्चेत तिला या दोघांनी ही इमारत पुनर्विकासासाठी जाणार असून २०१३ मध्ये तिथे राहणाऱ्याया रहिवाशांना फ्लॅटचा ताबा दिला जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात फ्लॅटचा एक कोटी वीस लाखांमध्ये व्यवहार झाला होता.

तिच्या मुलाने ही रक्कम तन्ना बंधूंच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा केली; मात्र ही रक्कम देऊन त्यांनी फ्लॅटचे रजिस्ट्रेशन तिच्या नावावर करून दिले नव्हते. फ्लॅटसह रजिस्ट्रेशनसाठी सव्वाकोटी रुपये घेतल्यानंतरही जयेश, दीप आणि विवेक या तिघांनी फ्लॅटची परस्पर जॅकी मेहता या व्यक्तीला विक्री करून वयोवृद्ध महिलेची फसवणूक केली होती. विशेष म्हणजे फ्लॅट घेण्यासाठी जयेश तन्नाने एका खासगी बँकेतून ९४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाच्या या पैशांचाही त्यांनीच अपहार केला होता.
कर्जाचे हप्ते भरत नसल्याने बँकेने त्याला नोटीस बजाविली होती; मात्र नोटीसला उत्तर न दिल्याने बँकेने हा फ्लॅट जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. अशा प्रकारे जयेश, दीप आणि विवेक तन्ना यांनी फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करून तक्रारदार महिलेकडून सव्वाकोटी रुपये घेऊन तिच्या नावावर फ्लॅटचे रजिस्ट्रेशन न करता तोच फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विकून तिची फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिने या तिघांविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ४ मे रोजी या तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यांत शुक्रवारी जयेश तन्नाला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलिस कोठडीत आहे. जयेशने फ्लॅटच्या नावाने आतापर्यंत अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला आता कांदिवली पोलिसांनी अटक केली. डी. एन. नगर, आर्थिक गुन्हे शाखा, कांदिवलीसह इतर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.