
दाखले वाटप शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद
भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : देवा ग्रुप फाउंडेशनच्या मागणीनुसार तहसीलदार अधिक पाटील यांच्या आदेशाने तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत येथे मोफत दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थी व नागरिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. या दाखले वाटप शिबिराला भिवंडी पूर्वचे माजी आमदार रूपेश म्हात्रे, देवाग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित ढोले, सरपंच वैजयंती कुंवर, उपसरपंच संजय थळे, सदस्य अनंता वाकडे, मोहन मसणे, राम सोरे, सुरेंद्र गुळवी, नितेश कासार, रवी पाटील आदी उपस्थित होते. रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, अधिवास दाखला अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना भिवंडी तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भुर्दंड पडत असतो. त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचवण्यासाठी सोनाळे ग्रुप ग्रामपंचायत सभागृहामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.