सुक्‍या मासळीचे दर गगनाला

सुक्‍या मासळीचे दर गगनाला

पडघा, ता. २९ (बातमीदार) : पावसाळा काही दिवसांवर आला असून दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद राहणार आहे. हंगामाचा शेवट चांगला करण्यासाठी मच्छीमार सरसावले आहेत. मात्र पकडलेली मासळी बाजारात न विकता, सुकवून विकण्याकडे मच्छीमारांचा कल वाढत आहे. पावसाळ्यासाठी अनेक गृहिणींकडून बेगमी करून ठेवण्यात येत असल्‍याने सुक्‍या मासळीची मागणी वाढल्‍याने दरही गगनाला भिडले आहेत. सुक्या मासळीसाठी प्रसिद्ध असलेल्या भिवंडी तालुक्यातील पडघा येथील आठवडा बाजार सुकी मासळी खरेदीसाठी नागरीकांनी गर्दी होत आहे.
सध्या पडघा येथील आठवडा बाजारात सुकी मासळी खरेदी-विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. विशेष म्हणजे भिवंडी तालुक्यासह आसपासच्या ग्रामीण भागातून शेकडो नागरिक पावसाळ्यापूर्वी अगोटीची सुकी मासळी घेण्यासाठी पडघा येथील आठवडा बाजारात येत आहेत. येथील बोंबील, करंदी, सुकी कोळंबी, वाकट्या, मांदेली यांची मोठ्याप्रमाणात विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने सुक्या मासळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुक्या मासळीच्या दरात सरासरी १०० ते १५० रुपयांची वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी शेकडा ४०० रुपयांनी मिळणारे सुके बोंबील यंदा ५०० रुपये शेकडा मिळत आहेत. जवळा, करंदीचे दर १०० रुपयांनी तर कोळंबी प्रति किलो ४५० ते ५०० रुपये आहे. जवळा ३०० ते ३५० रुपये किलोने विकला जात आहे.
.....
ढगाळ वातावरणाचा फटका
अवकाळीसह ढगाळ वातावरणामुळे मध्यंतरी मासळी सुकवण्यात अडचणी आल्‍या होत्‍या. खोल समुद्रात मासळी मिळाली तर सुकवण्यासाठी पोषण वातावरण नव्हते आणि जेव्हा वातावरणातील उष्‍मा वाढला तेव्हा मासळीच मिळेनाशी झाल्‍याने सुक्या मासळीचे दर वधारले आहेत. सध्या पडणाऱ्या उन्हामुळे ताजी मासळी लगेचच सुकवली जात आहे. तिचा दर्जा व चव चांगली राहिल्‍यास भाव चांगला मिळतो. त्‍यामुळे मच्छीमार मासळी त्वरित विकण्याऐवजी सुकवून विकण्याला प्राधान्य देत आहेत.
....
मासळी दर (रुपयांमध्ये)
बोंबील ६०० ते ७००
करंदी ६००
जवळा ४०० -५००
मांदेली ३५०-४००
दांडी ५००-६००
माकूल ३५०-४००
सोडे १८००-२०००
वाकटी ५००-७००
....
पडघा : येथील आठवडा बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com