जलजीवन योजनेचे काम निकृष्ट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलजीवन योजनेचे काम निकृष्ट!
जलजीवन योजनेचे काम निकृष्ट!

जलजीवन योजनेचे काम निकृष्ट!

sakal_logo
By

श्रीवर्धन, ता. २९ (बातमीदार) ः तालुक्यातील साखरोणे गावात जलजीवन मिशनअंतर्गत विहीर बांधण्याचे काम सुरू आहे, मात्र निकृष्ट कामामुळे ग्रामस्‍थांमध्ये नाराजी आहे. शिवाय विहिरीच्या कामात सुरुंग लावण्याने गावात पूर्वीपासून जलस्रोत असलेल्या विहिरींमधील पाणीपातळी खालावल्‍याने ग्रामस्‍थ आक्रमण झाले आहेत.
तालुक्यात अनेक ठिकाणी जलजीवन मिशनचे काम प्रगतिपथावर आहे. साखरोणे येथील कामात ठेकेदाराच्या मनमानीमुळे विहिरीचे खोदकाम, पाणीचे टाके ही कामे अंदाजपत्रक डावलून सुरू आहे. गावासाठी जवळपास ७४ लाखांची पाणी योजना मंजूर झाली आहे. विहिरीपासून ते जलजीवन मिशनचा टाकीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्‍यानुसार जलवाहिनीसाठी खड्ड्याची खोली तीन फूट असते, मात्र ठेकेदार काही इंचाचे खोदकाम करून पाइप टाकण्याकरिता नाल्‍या तयार करीत आहे. त्‍यामुळे गावाला पाणी मिळण्याची शक्‍यता धुसरच आहे.
ग्रामस्‍थांनी जो जलस्रोत निवडला होता, त्‍यात अडचणी सांगून वेगळ्या ठिकाणी विहीर बांधली आहे. जमिनीपासून उंच जागेवर विहीर बांधण्यात आली आहे. शिवाय नैसर्गिक झऱ्याला अत्यल्प पाणी असल्‍याने ते थेट जलजीवनच्या विहिरीत सोडले जात आहे. विहिरींचे कामही मापदंडानुसार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कंत्राटदाराविरोधात ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभाग व गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

साखरोणे गावातील विहीर ही सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना कल्पना देऊनच बांधली आहे. शिवाय पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी प्रत्‍यक्ष भेट देत पाहणीही केली आहे.
- युवराज गांगुर्डे, पाणीपुरवठा विभाग

स्वदेश संस्थेमार्फत गावात लोकसहभागातून विहीर व जलवाहिन्या टाकल्या होत्या, मात्र जलजीवन पाणीयोजनेचे काम करताना जलवाहिनी तोडली गेली. लाखोंची योजना ही कागदोपत्रीच करण्याचा डाव कंत्राटदार व अधिकाऱ्यांचा असून त्‍याला आमचा विरोध आहे. योजना राबवताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही.
- संदीप कासरूंग, ग्रामस्थ, साखरोणे

साखरोणे ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाली असून पाणीपुरवठा विभागाकडे पाठवली आहे. जलजीवन पाणी योजना पाणीपुरवठा विभागामार्फत राबवल्या जात आहेत.
- गजानन लेंडी, गटविकास अधिकारी

श्रीवर्धन ः झरा असलेल्या जागी विहीर न बांधल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले.

.....

कर्जतमध्ये नियोजनाअभावी पाणीटंचाई
नगराध्यक्षांनी घेतला पाणी पुरवठा विभागाचा आढावा
कर्जत, ता. २९ (बातमीदार) ः काही महिन्यांपासून कर्जत शहरातील काही प्रभागात कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे. याची दखल घेत पाणीपुरवठा योग्‍य नियोजन करावे तसेच कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या समजावून घेण्यासाठी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी नुकतीच पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली.
पाणीपुरवठा करताना येणाऱ्या अडचणींवर या वेळी चर्चा करण्यात आली. कर्जत नगरपरिषद क्षेत्रात योग्य पाणीपुरवठा होण्यासाठी वेळेचे नियोजन प्रायोगिक तत्त्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नगराध्यक्ष जोशी यांच्या दालनात झालेल्‍या बैठकीत उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणीपुरवठा सभापती वैशाली मोरे, नगरसेवक राहुल डाळिंबकर, बळवंत घुमरे, प्राची डेरवणकर, स्वामिनी मांजरे, पुष्पा दगडे, भारती पालकर, सुवर्णा निलधे, दीपक मोरे आदी उपस्थित होते.

गळती रोखण्यासाठी उपाययोजना
दहिवली विभागात संध्याकाळी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, ज्या ज्या ठिकाणी कमी दाबाने पुरवठा होतो, त्या ठिकाणी तपासणी करणे, गळती रोखण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करण्याच्या

सूचना नगराध्यक्ष जोशी यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित सर्व कर्मचारी आणि वॉलमन यांच्या समस्याही जाणून घेण्यात आल्या.