प्रीमियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियर
प्रीमियर

प्रीमियर

sakal_logo
By

‘किसी का भाई किसी की जान’ लवकरच ओटीटीवर
बॉलीवूड अभिनेता सलमान खान सध्या चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असतो. सध्या सलमानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सलमानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ही बातमी कळल्यानंतर सलमानचे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. एवढेच नाही तर सलमान ओटीटीवरही पदार्पण करणार आहे. सलमानला ओटीटीसाठी एका वेबसीरिजची संकल्पना चांगलीच आवडली आहे. शिवाय ही वेबसीरिज अॅक्शनने भरलेली असणार आहे, असेही सांगितले जात आहे. अद्याप या गोष्टींवर चर्चा सुरू असून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
.............

राखीसोबत डान्स करताना विकीचा तोल गेला
अबुधाबीमध्ये आयफा २०२३ या सोहळ्यामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विकी कौशल राखी सावंतसह एका गाण्यावर डान्स करताना थोडक्यात पडताना वाचला आहे. विकीच्या या व्हिडीओमध्ये तो सारा अली खान आणि राखी सावंतसोबत दिसत आहे. व्हिडीओची सुरुवात सारा आणि विकी पहिल्यांदा चिकनी चमेलीच्या तालावर नाचताना होते. त्यावेळी विकी म्हणाला, ‘चला शीला की जवानीवर नाचूया’. त्यानंतर तो राखीसोबत डान्स करताना दिसत आहे. यादरम्यान राखीने विकीला जोरदार ठुमका मारला. त्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो पडता पडता वाचला. अबूधाबीमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळयामध्ये सलमान खान, नोरा फतेही, क्रिती सेनॉन, जॅकलीन फर्नांडिस, वरुण धवन आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासह अनेकांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. यामध्ये ‘विक्रम वेधा’ या चित्रपटासाठी हृतिक रोशनला प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
........

वैदेही ‘छोटे उस्ताद’चे सूत्रसंचालन करणार
स्टार प्रवाहवर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’चे दुसरे पर्व सुरू होणार आहे. पहिल्या पर्वाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. १० जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर लहानग्यांच्या सुरांची मैफल अनुभवता येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. सूत्रसंचालनाच्या अनुभवाविषयी सांगताना वैदेही म्हणाली, ‘एका सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मी छोटे उस्तादच्या पहिल्या पर्वात सहभागी झाले होते. या मंचावरचे टॅलेण्ट पाहून मी भारावून गेले होते. इतका भरभरून प्रतिसाद पहिल्या पर्वाला मिळाला. याच प्रेमापोटी दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली आहे. दुसऱ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर आहे. ज्या पद्धतीचे टॅलेण्ट या मंचावर आहे ते पाहून अवाक व्हायला होते. माझ्या सूत्रसंचालनाची सुरुवात स्टार प्रवाहमुळेच झाली. प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा मी पहिल्यांदा होस्ट केला होता’.

‘गेमाडपंथी’चा रहस्यमय ट्रेलर
आगामी वेबसीरिज ‘गेमाडपंथी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये चिकूच्या किडनॅपिंगचा प्लॅन बनताना दिसत आहे. आता हा चिकू कोण? आणि त्याला का किडनॅप करत आहेत. याशिवाय हनीच्या लिपस्टिक लावण्यामागचे नेमके रहस्य काय? या सगळ्याचीच आता लवकरच उत्तरे मिळतील. या सगळ्या गोंधळात भल्याभल्यांची वाट लागणार असून एकापेक्षा एक मोठे गेमही होणार आहेत. यात कोण कोणावर भारी होणार, हे ‘गेमाडपंथी’ पाहिल्यावरच कळेल. बोल्डनेसने भरलेली ही वेबसीरिज कॉमेडी, थ्रिलर आणि रहस्यमयही आहे. प्लॅनेट मराठी ओरिजनल्सच्या यादीत आणखी एका वेबसीरिजचे नाव समाविष्ट झाले असून, दि फिल्म क्लिक स्टुडिओजने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे. दिग्दर्शक संतोष कोल्हे म्हणतात, ‘टीझर पाहून अनेकांनी मला फोन, मेसेज केले. काय आहे नक्की ‘गेमाडपंथी’? यातील विविध पात्रे एकमेकांचा गेम करत असतानाच स्वतःच एखाद्या गेमचे शिकार बनत आहेत. आता हे गेम कसे होत आहेत आणि ‘गेमाडपंथी’ नक्की काय आहे, हे प्रेक्षकांना वेबसीरिज पाहताना कळेलच. यात अनेक दर्जेदार कलाकार आहेत’. या वेबसीरिजमध्ये चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २ जूनपासून दर शुक्रवारी प्लॅनेट मराठी ओटीटीवर या रहस्याची उत्तर उलगडणार आहेत.

‘रफुचक्कर’मध्ये मनीष पॉलचे हटके लूक्स
आगामी वेबसीरिज ‘रफुचक्कर’चा टीझर आणि पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या वेबसीरिजच्या ट्रेलरमध्ये मनीष पॉल वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसत आहे. पहिल्याच वेबसीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण करत मनीष पॉल हा एका मनोरंजक पात्रात दिसणार आहे. ही सीरिज १५ जूनला जिओ सिनेमावर प्रदर्शित होईल. मनीष पॉल या आधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. मनीष हा अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्स आणि परफेक्ट कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. या वेबसीरिजमधील भूमिकेत मनीष ॲक्शन करताना दिसणार आहे. अप्रतिम अष्टपैलुत्व व्यक्तिमत्त्व असलेला हा अभिनेता एका फिटनेस तज्‍ज्ञापासून ते जाड वृद्धापर्यंत, पंजाबी वेडिंग प्लॅनरपासून ते हँडसम हंक अशा मजेदार लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यास सज्ज आहे. या वेबसीरिजमध्ये प्रिया बापट, अक्षा परदासनी, सुशांत सिंग आणि शिरीन सेवानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ज्योती देशपांडे, अर्जुन सिंग बरन, कार्तिक डी निशानदार निर्मित आणि रितम श्रीवास्तव दिग्दर्शित हा कॉन थ्रिलर ड्रामा १५ जूनपासून जिओ सिनेमावर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.