
किसान सभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा
कासा, ता. २९ (बातमीदार) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने उद्या (ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. जमीनविषयक प्रश्न सुटतील, असे ठोस आश्वासन किसान सभेच्या शिष्टमंडळाला संगमनेर येथे २७ एप्रिल २०२३ रोजी महसूल मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या ताब्यात असलेली जमीन मालकीची झाली पाहिजे, या करिता जमीनविषयक अर्ज सरकार दरबारी सादर केले पाहिजेत. यासाठी किसान सभेच्या वतीने मंगळवारी दुपारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी अध्यक्ष किसन गुजर, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, उमेश देशमुख हे करणार आहेत. तसेच डहाणू आमदार विनोद निकोले हे उपस्थित राहणार आहेत.