
मजुरांअभावी मान्सूनपूर्व कामे रखडली
विक्रमगड, ता. ३० (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास आहे. जिल्ह्यातील उन्हाचा कडाका वाढत असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. उन्हात घाम गाळणारा शेतकरीही वाढत्या तापमानामुळे हैराण झाला आहे. या कडक उन्हात मजूरही शेतकाम करण्यासाठी येण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व कामे रखडली आहेत.
पावसाच्या आगमनाला काही दिवसाचा शिल्लक असल्याने ग्रामीण भागात मान्सूनपूर्व कामांची लगबग सुरू आहे. विक्रमगड परिसरात मशागतीच्या कामांना वेग आला आहे. बैलांच्या साह्याने नांगरटीची कामे, बांध घालणे, तरवा करण्याची कामे सुरू आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून उन्हाचा वाढलेला पारा खाली येण्याचे नाव घेत नसल्याचा परिणाम सर्वच क्षेत्रात झाला आहे. उन्हात घाम गाळणारा शेतकरीही या वाढत्या तापमानामुळे हैराण झाला आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. या ठिकाणीही मजूर उन्हामुळे काम करण्यासाठी त्रासला आहे.
मे महिना हा शेतकऱ्यांचा मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी असतो. बांधबंदिस्ती करणे, राबणी करणे, शेतात शेणखत, गाळाची माती पसरणे अशी विविध कामे ही पावसापूर्वी शेतकऱ्यांना करावी लागतात. ही कामे लवकरात लवकर करण्यासाठी शेतकरी मजुरांची मदत घेतो. मात्र मे महिना सुरू झाल्यापासून दररोज ३८ ते ४० अंश तापमानात काम करण्यासाठी मजुरवर्गही कामासाठी घराबाहेर पडत नसल्याने शेतकरी अधिकच अडचणीत आला आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनापूर्वी ही कामे कशी करावीत, या विवंचनेत शेतकरी पडला आहे.
कुणी पाणी देता का पाणी?
घराबाहेर कामासाठी बाहेर पडणारे मजूर कामापेक्षा सावलीच्या व पिण्याच्या पाण्याच्या शोधातच अधिक वेळ घालवत आहेत. एखाद्या गाव, पाड्याशेजारी काम असेल तर काही मजूर पाण्याचे हंडे, बाटल्या घेऊन कुणी पाणी देता का पाणी, असे विचारत फिरत असतात.
पावसाच्या आगमनाला काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र गावात शेती कामे करण्यासाठी मजूर मिळत नाही. मजूरांना जास्त पैसे देण्याची तयारी दाखवूनही उन्हामुळे त्रास होण्याची भीतीपोटी कोणी कामाला येत नाही.
- दिनकर पाटील, शेतकरी
उन्हाच्या त्रासामुळे काम करणे खूप कठीण होत आहे. कडाक्याच्या उन्हात काम करताना एखाद्याचा उष्माघाताने मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- संजय कोरडा, मजूर, विक्रमगड