रायगड

रायगड

कोंडवी गण, मोरगिरी दळवीवाडीतील ग्रामस्‍थांचा शिवसेनेत प्रवेश
पोलादपूर (बातमीदार)ः तालुक्यातील कोंडवी गणाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तसेच युवक अध्यक्ष तसेच मोरगिरी दळवीवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. कोंडवी गणाचे अध्यक्ष बारकू रामजी शिंदे, प्रमोद प्रदीप शिंदे, तसेच दत्ताराम शिंदे, दिलीप शिंदे, विजय शिंदे ,अक्षय शिंदे, कल्पेश शिंदे, हेमा शिंदे, प्रमिला शिंदे, ललिता शिंदे, जनाबाई शिंदे ,वंदना शिंदे इत्यादींनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेश समारंभावेळी माजी राजीप सदस्य चंद्रकांत कळंबे, पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, विभाग प्रमुख सतीश शिंदे, सुरेश मोरे, संदीप सकपाळ ,विजय बुवा मोरे, सुरेश बुवा शिंदे, जगदीश महाडिक आदी उपस्थित होते
---------------------

जिल्ह्यातील १५३ तलावांना नवसंजीवनी
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची माहिती

अलिबाग, ता. ३० (बातमीदार) ः दुर्लक्षित तलावांमुळे पर्यावरण समतोल बिघडण्याचा धोका अधिक आहे. मात्र रायगड जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे जात सरोवर संवर्धन अभियानांतर्गत जिल्ह्यातील १५३ तलावांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. तलावांमधील गाळ काढणे, सुशोभीकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जीवित करणे अशी कामे पूर्ण करण्यात आल्‍याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
सरोवर संवर्धन अभियानांतर्गत एक एकर क्षेत्राचे नवीन तलाव निर्मिती करणे, तसेच अस्तित्वात असलेल्‍या तलावाचे सुशोभीकरण, देखभाल दुरुस्‍ती करणे यासह तलाव परिसरात वृक्ष लागवड, स्‍वच्छतागृहाची व्यवस्‍था करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुका स्तरावर अस्तित्वात असणारे १७८ तलावांची अमृत सरोवर पोर्टलवर नोंद केली आहे. लोक सहभाग व ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आणि सरकारच्या विविध योजना तसेच कंपन्यांच्या विकास निधीतून तलावांची कामे हाती घेण्यात आली. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, महिला बचत गट, नागरिकांच्या सहभागातून जिल्ह्यातील १५३ तलावांचे संवर्धन करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश मिळाले आहे. याशिवाय उर्वरित २५ तलावांचे संवर्धन करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

तलावांचे संवर्धन


अलिबाग - ११
कर्जत - १०
खालापूर - २०
महाड - ११
माणगाव - १४
म्हसळा - ७
मुरूड - ९
पनवेल - १३
पेण - ८
पोलादपूर - १०
रोहा - १३
श्रीवर्धन - ५
सुधागड - १०
तळा - २
उरण - १० तलावांचे संवर्धन करण्यात आले आहे.

-----------------

काळ नदीची पातळी खालावल्‍याने जॅकवेल कोरडे
माणगावात दिवसाआड पाणी
माणगाव, ता. ३१ (बातमीदार) ः माणगाव नगरपंचायत क्षेत्रातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या काळी नदीची पातळी खालावल्‍याने जॅकवेलमधून पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. परिणामी माणगावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उष्‍मा वाढल्‍याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत पाणी पातळी अधिक खालावली आहे. त्यामुळे नगरपंचायतीने एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
माणगाव नगरपंचायतीत, २०११ च्या जनगणनेनुसार १९ हजार लोकसंख्या आहे. यात १७ प्रभाग येत असून भादाव, जुने माणगाव, खांदाड, नाणोरे, उतेखोल, उतेखोलवाडी, दत्तनगर, साईनगर, क्रांतीनगर, आदर्श समतानगर, वीरेश्वर नगर, विद्या नगर, बामणोली रोड, सिद्धी नगर, सुतारआळी, ढालघरफाटा, बाजारपेठ, मोर्बा रोड अशा विविध भागात दहा जलवाहिन्यांद्वारे नगरपंचायतीकडून पाणी पुरवठा केला जातो. सध्या काळ नदीची पातळी खालावल्‍याने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
माणगाव ग्रामपंचायतीचे १९७२ मध्ये उमव तेखोल भागात काळ नदीवर जॅकवेल बसवले होते. त्या वेळी ही योजना जीवन प्राधिकरणकडे होती. त्यानंतर माणगाव ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली. त्यात वेळोवेळी सुधारणा करीत ही योजना वाढत्या लोकसंख्येनुसार कार्यान्वित करण्यात आली. माणगाव नगरपंचायतीचे २०१५ मध्ये ती ताब्यात आली.
नदीची पातळी खालावल्‍याने नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून अनेक भागात कमी दाबाने तर काही भागात अनियमित पाणी येत आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी कालव्याला पाणीपुरवठा नियमित सुरू होण्यासाठी नगरपंचायत प्रयत्न करीत आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी जपून व गाळून, उकळून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

माणगाव ः पाणी पातळी कमी झाल्याने कोरडे पडलेले जॅकवेल .

................
नेरळकरांना पाणीटंचाईची झळ
नळपाणी योजनेंतर्गत नवीन साठवण टाकीचे काम सुरू

नेरळ, ता. ३१ (बातमीदार) ः नेरळकरांना पुढील काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. साठवण क्षमता कमी असलेली जुनी टाकी काढून जागी नवीन पाण्याची टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. कामादरम्‍यान पुरवठा खंडित केला जाणार असल्‍याने नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा पारधी यांनी केले आहे.
नेरळ ग्रामपंचायतीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १९९८ मध्ये तत्‍कालीन ३६ हजार लोकसंख्या गृहित धरून नळपाणी योजना तयार केली होती. मात्र सध्या नेरळ ग्रामपंचायतीतील केवळ निम्‍म्‍या भागातच सुरळीत पाणी पुरवठा होतो. तर उर्वरित भागात कमी दाबाने, अपुरा पाणी पुरवठा होत असल्‍याने नागरिक त्रस्‍त आहेत. उन्हाळ्यात नदीचे पाणी आटल्‍याने टंचाईच्या झळा आणखी तीव्र झाल्‍या आहेत.
नेरळकरांची पाणीसमस्या कायमची मिटवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी नुकतीच आमदार महेंद्र थोरवे यांच्या भेट घेत पाणी योजना मंजूर करून घेतली आहे. योजनेचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामही सुरू झाले आहे. त्‍यामुळे नेरळकरांच्या पाणीपुरवठ्‌यात आणखीनच घट झाली आहे.
दरम्यान नेरळ शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या बोरले येथे जुन्या पाणी साठवण टाकीच्या जागी नवीन टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. याकामाची पाहणी सरपंच उषा पारधी, ग्रामसेवक गणेश गायकर, सदस्य जयश्री मानकामे, राजन लोभी, गीतांजली देशमुख, श्रद्धा कराळे, शिवाली पोतदार, उमा खडे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र कराळे, ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश इरमाले यांनी नुकतीच केली आहे.

अपुरा पाणीपुरवठ्यामुळे नेरळवासीयांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागते आहे, मात्र नळपाणी योजनेचे काम सुरू झाल्‍याने लवकरच पाणी समस्‍या निकाली निघेल. त्‍यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे. ग्रामपंचायतीला सहकार्य करून महत्त्वकांक्षी प्रकल्पात सहभाग नोंदवावा.
- उषा पारधी, सरपंच

---------------------

आदर्श विद्यामंदिर रामवाडीत कराटे प्रशिक्षण
पेण (वार्ताहर) : कराटे स्पोर्ट्स ॲकॅडमी, महाराष्ट्र शाखेच्या माध्यमातून पेणमधील रामवाडी आदर्श विद्यामंदिर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून त्‍याचे उद्‌घाटन शाळेचे उपाध्यक्ष ह.भ.प. कृष्णा वर्तक यांच्या हस्ते करण्यात आले. कराटे हा शारीरिक, बौद्धिक, मानसिक, विकासाचा खेळ असून प्रत्येक मुला-मुलींनी आत्‍मसंरक्षणासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्‍यचे वर्तक यांनी स्‍पष्‍ट केले. प्रशिक्षक संतोष मोकल मंगळवार, शनिवार, रविवार हे तीन दिवस ५.३० ते ७.३० या दरम्यान महिनाभर मोफत प्रशिक्षण देणार असून प्रथम ५० विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
पेण ः

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com