
ठाण्याच्या सावर्डेकरचे घवघवीत ‘यश’
ठाणे, ता. २७ : ठाण्याच्या यश सावर्डेकर या खेळाडूने मोठी झेप घेतली आहे. राष्ट्रीय डेफ (बधिर खेळाडू) स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर आता यशची जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या कामगिरीबद्दल चोहोबाजूंनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. जागतिक स्पर्धा १६ ते २५ जुलै या दरम्यान ब्राझीलमध्ये रंगणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी प्रशिक्षण योजनेत महाराष्ट्र राज्य तसेच देशाच्या अनेक विभागांमधून अनेक खेळाडू वर्षानुवर्षे सराव करून बॅडमिंटन क्रीडाविश्वात स्वतःचे नाव उंचावत करीत आहेत. या खेळाडूंच्या जोडीला ठाणे बॅडमिंटन अकादमीमध्ये दिव्यांग खेळाडूंना देखील विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्यासाठी स्वतंत्र सराव सत्र तयार केले जाते. आतापर्यंत अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणारे दिव्यांग बॅडमिंटनपटू या प्रशिक्षण योजनेने घडविले आहेत. यामध्ये गिरीश शर्मा आणि आरती पाटील यांचा प्रामुख्याने सहभाग आहे. आता हीच परंपरा ठाणे अकादमीचा यश सावर्डेकर याने कायम ठेवली आहे.
जन्मापासून कर्णबधिर असणाऱ्या यशने लहानपणापासून अनेक अडचणींचा सामना केला आहे. खेळाडू म्हणून स्वतःला घडवताना त्याने अत्यंत मेहनत करीत राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या २५व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यशने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांनाच दखल घेण्यास भाग पडले. सुरुवातीचे सामने एकहाती जिंकत त्याने ब्राँझपदकापर्यंत मजल मारली. त्यानंतर त्याला जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरता आला.
ठाणे अकादमीत कसून सराव
ब्राझीलमध्ये होणार असलेल्या जागतिक स्पर्धेसाठी यश कसून सराव करीत आहे. त्याच्यासाठी ठाणे बॅडमिंटन अकादमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड आणि संपूर्ण टीम यांनी स्वतंत्र प्रोग्रॅम तयार केला आहे. सध्या सुरु असलेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात त्याची उत्तम अंमलबजावणी होत आहे.
सनायाला राज्य स्पर्धेचे अजिंक्यपद
कल्याण-पलावा येथे झालेल्या ज्युनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा एकदा सनाया ठक्कर हिने अजिंक्यपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. २०२२-२३ या वर्षात देखील तिने दोन्ही राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अर्थातच १३ वर्षाखालील गटात दुहेरी तसेच एकेरीमध्ये देखील पदक पटकावले होते. आता पुन्हा एकदा सुवर्णपदक मिळवून तिने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. याप्रसंगी यश सावर्डेकर आणि सनाया ठक्कर यांच्या कामगिरीबद्दल व्यक्त होताना श्रीकांत वाड यांनी आपल्या खेळाडूंच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे संपूर्ण टीमला एक वेगळी ऊर्जा मिळते आणि आम्ही अजून कसून सराव करून घेण्यासाठी तसेच खेळाडूंच्या विकासासाठी मेहनत घेण्यासाठी सज्ज होतो, असे नमूद केले आहे.