
ठाण्यातील तलावांना नवी झळाळी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे शहराची तलावांचे शहर ही ओळख टिकून राहावी, यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत पालिका हद्दीतील १५ तलावांचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार या तलावांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहरातील तलावांना नवी झळाळी मिळणार आहे.
ठाणे शहर हे जरी तलावांचे शहर म्हणून ओळखले जात असले तरी आजही अनेक तलावांचे संवर्धन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यात केंद्र शासनाच्या अमृत - २ योजनेंतर्गत शहरातील १५ तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरणास राज्यस्तरीय तांत्रिक समितीने १४ नोव्हेंबर २०२२ रोजी अंतिम मान्यता दिली. यानंतर महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रक तयार केले होते. या तलावांच्या सुधारणा व सुशोभीकरणासाठी एकूण ५९.९४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार १४.९८ कोटी, तर राज्य सरकार १४.९८ कोटी खर्च करणार आहे; तर महापालिका प्रशासन ५० टक्के तत्त्वावर २९ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यानुसार शहरातील वागळे इस्टेटच्या रायलादेवी तलावासह अन्य १४ तलावांचा कायापालट होणार आहे. कळव्यातील मुख्यत: तुर्फे पाडा, खारेगाव, हरियाली, शिवाजी नगर, कौसा, कोलशेत, दातिवली, देसाई, ब्रम्हाळा, आंबे-घोसाळे, कचराळी, कमल, खिडकाळी आणि जोगीलाचा समावेश आहे.
ही कामे केली जाणार
या योजनेंतर्गत तलावामध्ये संरक्षण (गॅबियन) भिंत, आतील भिंत (कुंपन), आसनव्यवस्था, जॉगिंग ट्रॅक, फूटपाथ, रेलिंग आदी कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय शुद्धीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. कारंजा, विद्युतीकरण, सुरक्षा यंत्रणेसाठी सीसी टीव्ही आणि मनोरंजनासाठी ध्वनी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आता शहरातील तलावांना नवी झळाळी मिळणार आहे.