कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर चर्चा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर चर्चा!
कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर चर्चा!

कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर चर्चा!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात जातात; मात्र त्यांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवताना मोठी कसरत करावी लागते. तसेच एका मिनिटात बुकिंग फुल होत असल्याने अनेकांच्या हाती वेटिंगचे तिकीट पडते. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ज्यादा विशेष रेल्वे गाड्या सोडण्याच्या मागणीसह कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत चर्चा केली.

दलालांच्या रॅकेटमुळे कोकणातील रेल्वे गाड्यांचे बुकिंग सुरू होताच फूल होत असल्याचे आरोपही रेल्वेवर होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली. गणेशोत्सवातील तिकीट बुकिंगच्या आरोपांसंदर्भात व अधिकच्या उत्सव विशेष रेल्वे गाड्यांसह कोकणातील प्रवाशांचा मागण्यासंदर्भात या वेळी चर्चा करण्यात आली आहे. या वेळी आरोपांसंबंधात तसेच अधिकच्या उत्सव विशेष गाड्यांसंदर्भात योग्य तो मार्ग काढण्याबाबत रेल्वे मंत्र्यांनी आश्वस्त केले.

मिनी टॉय ट्रेनबाबत सकारात्मकता
तुतारी एक्स्प्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नादंगाव स्टेशनवर थांबविण्यात येणार आहे. कोकण रेल्वेवरील ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला कणकवली येथे थांबा देण्याचा निर्णय झाला आहे, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. याशिवाय पडवे येथील रेल्वेचा अंडरपास बांधण्याच्या प्रस्तावास रेल्वेमंत्र्यांनी मान्यता दिली. कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मिनी टॉय ट्रेनबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.
-------------------