
कलानगर विश्रामगृह आजपासून नूतनीकरणासाठी बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : कोरोना महामारीच्या काळामध्ये वरळीतील विश्रामगृह विविध कामांसाठी वापरण्यात आले होते. त्यानंतर त्याचे नूतनीकरणाच्या कामानिमित्ताने आतापर्यंत बंद ठेवण्यात आले होते. परिणामी संपूर्ण भार वांद्रे येथील कलानगरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर आला होता. मात्र, आता वरळीतील विश्रामगृह ५ जूनपासून सुरू होणार आहे. उद्यापासून (ता. १) कलानगर विश्रामगृह नूतनीकरणासाठी बंद होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे.
मुंबईतील मनोरा आमदार निवासाची इमारत पाडल्याने आमदारांना राहण्याची अडचण निर्माण झाली आहे. राज्य सरकारने आमदारांना दोन रूम दिल्या नाहीत, त्यामुळे त्यांना दीड लाख रुपये दरमहा देण्यात येत आहेत; तर ज्या आमदारांकडे एक रूम आहे, त्यांना ७५ हजार रुपये दरमहा दिले जात आहेत; तर अन्य राजकीय नेत्यांसह अधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबईतील विश्रामगृहाचा सहारा आहे. मात्र, त्यातही या गृहांचे नियमित नूतनीकरणाचे काम सुरू राहत असल्याने मुंबईत मुक्कामी राहण्यात अडचणी येताना दिसून येते. मात्र, आता कलानगर येथील विश्रामगृह पूर्णत: बंद करून वरळीतील विश्रामगृह खुले केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले.