
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणींना उजाळा
ठाणे, ता. १ (बातमीदार) : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाण्यातील राज्याभिषेक समारोह या संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानवंदना म्हणून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासह अभिवादन यात्राही काढण्यात आली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुन्हा एकदा सर्व नागरिकांनी स्मरण करावे, त्यांचे विचार अंगिकारावेत आणि त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा, या उद्देशाने राज्याभिषेक समारोह या संस्थेने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील स्वा. सावरकर स्मारकात ३५० दिव्यांची रोषणाई केली होती. यावेळी या ठिकाणी सावरकरांची निवडक गीते सादर करण्यात आली. तसेच संस्थेतील काही सदस्य आणि शहरातील तरुण मंडळींसह सावरकर अभिवादन यात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. यामध्ये तरुणांनी हातात मशाली घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव घोषणा देत मासुंदा तलावाला प्रदक्षिणा घातली. गडकरी रंगायतन येथील सावरकर यांच्या स्मारकासमोर ठाणेकरांनी हजेरी लावत सावरकरांना अभिवादन केले. यावेळी ब्रह्मांड कलासंस्कार समूहाने जयोस्तुते, जय देव जय देव शिवराया या गीतांनी वातावरण मंत्रमुग्ध केले. डॉ. अश्विनी बापट यांनी वंदे मातरम गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.