ग्रामस्थांनी पाण्यासाठी खोदली विहीर

ग्रामस्थांनी पाण्यासाठी खोदली विहीर

कासा, ता. १ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील सायवन ग्रुप ग्रामपंचायतमधील चळणी कोनमाळ खुंटपाडा येथे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. यावर तोडगा काढण्यासाठी येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत पिण्याच्या पाण्यासाठी श्रमदानातून विहीर खोदली. त्यासाठी पाड्यातील ७० ते ८० ग्रामस्थ एकत्र आले होते.
डहाणू तालुक्यातील सायवन ग्रामपंचायतीमधील अनेक पाड्यांना मेअखेर पाण्याची समस्या जाणवते. कारण डोंगरदऱ्या टेकड्यावर राहणाऱ्या पाड्यांवर अनेक ठिकाणी पाणी पोहोचत नाही. विहिरी तळ गाठतात. बोरिंगला पाणी येत नाही. त्यामुळे या भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. सायवन येथे १० ते १२ कुटुंबे राहत असून, जवळपास ७० ते ८० बांधवांना सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. त्यासाठी त्यांना मोठी पायपीट करावी लागत होती. यावर उपाय म्हणून गावकऱ्यांनी एकत्र येत पाड्यातील श्रमदानातून विहीर खोदली आणि तिला पाणी सुद्धा लागले. वर्गणी काढत सिमेंट आणून विहिरीचे बांधकाम केले. यामुळे पिण्याची पाण्याची सोय झाली आहे. येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी केली होती; पण ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांनी एकजूट होत स्वतः पाण्याची समस्या सोडवत एक आदर्श निर्माण केला आहे.

सायवन ग्रामपंचायतमध्ये आमच्या पाड्याला पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी अनेक वेळा मागणी केली होती. पण पाण्याची सोय झाली नाही. त्यामुळे पाड्यातील नागरिक एकत्र येत मेहनत घेउन जमीन खोदली आणि वर्गणी काढून विहीर बांधली. आता यापुढे ग्रामपंचायतीने आम्हाला सहकार्य करावे, अशी मागणी आम्ही केली आहे.
- अनिल कुऱ्हाडा, नागरिक, खुंटपाडा

सायवन ग्रामपंचायतीमध्ये अनेक पाडे डोंगरदऱ्यात वसलेले आहेत. मेअखेरीस अनेक पाड्यांना पाणीटंचाई जाणवते. याकरिता ग्रामपंचायतीने काही दिवसांपूर्वी पाच पाड्यावर बोअरिंग मारून दिलेत. या पाड्यातील नागरिकांनी मागणी केली नव्हती. त्यामुळे तेथे बोअरिंग मारले नाही; पण आवश्यक असेल तिथे बोअरिंग मारून पाण्याची सोय केली जाईल.
- अरविंद पाटील, ग्रामविकास अधिकारी, सायवन ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com