
बेकायदा फलकबाजीला राजाश्रय
घणसोली, ता. १ (बातमीदार)ः नवी मुंबईत ठिकठिकाणी बेकायदा बॅनरबाजी करण्यात येते. कोणाचे वाढदिवस, काही कार्यक्रम असो की चौकात बॅनर लावले जात आहेत. घणसोली सेक्टर ४ येथील हावरे चौकाचेही बेकायदा फलकांमुळे विद्रूपीकरण झाले आहे. मात्र, कारवाई करण्यास गेल्यावर अडवले जात असल्याचा आरोप महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी केल्यामुळे बेकायदा फलकबाजीला राजाश्रय मिळत असल्याची चर्चा आहे.
शहराच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी रस्ते, पदपथ, चौकांमध्ये राजकीय व्यक्तींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, विविध कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणात बेकायदा बॅनरबाजी केली जाते. यामुळे शहर सौंदर्याला बाधा पोहचत असल्याने पालिकेकडून कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे, शहरात अनेकदा परवानगी असलेले बॅनर वेळेनंतरही हटवले जात नसल्याने या बॅनरमुळे अपघातांची शक्यता आहे. घणसोली विभागातील सेक्टर ४ मधील हावरे चौकात हीच परिस्थिती आहे. येथे सर्वत्र बॅनरचा विळखा असल्याने पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. तसेच या बॅनरची उभारणी विनापरवानगी केली असल्याने पालिकेकडून कारवाई केली जाणार होती. मात्र, या बेकायदा फलकबाजीवर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनाच अडवले जात असल्याने यापाठीमागे कोणत्यातरी बड्या नेत्याचा हात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
---------------------------------------
घणसोली विभागात अनेक ठिकाणी विनापरवानगी बॅनरबाजी केली जाते, पण हावरे चौकातील बॅनरवर कारवाई करण्यासाठी गेल्यावर अडवले जात आहे.
- संतोष शिलम, अतिक्रमण अधिकारी, महापालिका