पनवेल मतदारसंघावरून‘मविआ’त रस्सीखेच

पनवेल मतदारसंघावरून‘मविआ’त रस्सीखेच

कामोठे, ता. १ (बातमीदार) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल शहरात शुभेच्छा फलक झळकले आहेत. या फलकावर शिरीष घरत यांचा ‘भावी आमदार’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेने उघडपणे पनवेल विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने ‘मविआ’तच रस्सीखेच सुरू झाली आहे.
एकेकाळी पनवेल विधानसभा मतदारसंघाची एकहाती सत्ता उपभोगणारा शेकाप मागील दहा वर्षांत मागे पडला. पनवेल विधानसभा मतदारसंघातील दोन वेळच्या निवडणुकीत शेकापच्या उमेदवाराचा सलग पराभव झाला आहे. आगामी विधानसभा निवडणूक हे चित्र बदलण्यासाठी तसेच भाजपला विजयापासून रोखण्यासाठी काँग्रेसच्या गोटातून युवा नेते अभिजित पाटील, सुदाम पाटील, श्रुती पाटील, हेमराज म्हात्रे यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अद्याप कुणाचे नाव चर्चेत नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड-पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल येथील एचडीएफसी सर्कल येथे लागलेल्या शुभेच्छा फलकावर शिरीष घरत यांचा उल्लेख ‘भावी आमदार’ म्हणून केल्याने आगामी काळात पनवेल मतदारसंघावरूनही ‘मविआ’त नाराजीनाट्य रंगण्याची चर्चा आहे.
----------------------------------------
शेकापची राजकीय अस्तित्वाची लढाई
कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांच्या अटकेनंतर पनवेलमधील शेकापचे संघटन खिळखिळे झाले आहे. सक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे विरोधकांना अर्थात भाजपला याचा राजकीय फायदा झाला आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांची विजयाची हॅट्ट्रिक करण्याची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. याउलट सुंदोपसुंदीमुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ कमजोर होत आहे.
-----------------------------------------
पनवेलमध्ये शिवसेनेला पोषक वातावरण आहे. विधानसभा निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे.
- शिरीष घरत, शिवसेना जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com