संक्षिप्त

संक्षिप्त

ईशान्य मुंबईत महाजनसंपर्क अभियान
मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः महाजनसंपर्क अभियानांतर्गत ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी विद्याविहारमध्ये नुकतेच एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या नऊ वर्षांतील लोकहित आणि विकासकामांची माहिती पत्रकारांना देण्यात आली.
पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या विकासकामांचा लेखाजोखा पॉवरपॉईंट पद्धतीने सादर करण्यात आला. कोरोना महामारीदरम्यान भारतातील तब्बल २२० कोटी नागरिकांना प्रतिबंधक लस मोफत देण्यात आली. साडेतीन कोटी नागरिकांना पक्के घर देण्यात आले. मोदी सरकारने १२ कोटी घरांमध्ये जलजोडणी केली. २०१४ मध्ये देशातील ग्रामीण भागात फक्त ३९ टक्के शौचालये होती. तो आकडा आता १०० टक्क्यांवर गेला आहे. ९.६० कोटी नागरिकांना मोफत गॅस जोडणी देण्यात आली आहे. कोरोना महामारीदरम्यान केंद्र सरकारने तब्बल ८० कोटी जनतेला मोफत शिधावाटप केले इत्यादी मुद्दे पत्रकार परिषदेत मांडण्यात आले.

विकास हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सुयश
घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः विक्रोळीतील विकास हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. वाणिज्य विभागातून एकूण ३८७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यांपैकी ३४६ (८९.४० टक्के) उत्तीर्ण झाले. सोधा राजेश याने ८६.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. विज्ञान शाखेतील २२७ पैकी १७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल ७७.०९ टक्के लागला. अश्मित पगारे ७६.६७ टक्के गुण मिळवून प्रथम आला. अंजुम शेखने ७५ टक्के गुण मिळवले. कला शाखेतील ७७ पैकी ४५ विद्यार्थी (५८.४४ टक्के) उत्तीर्ण झाले. सत्या कोणार ७५.३३ टक्के मिळवून प्रथम आला. कला, वाणिज्य व विज्ञान विभागातून एकूण २१ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. १०१ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. संस्थेचे अध्यक्ष प. म. राऊत, चिटणीस डॉ. विनय राऊत व संस्था प्रतिनिधी मेघा परब, मुख्याध्यापिका वैष्णवी राऊत इत्यादींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मुलुंडमध्ये १० जून रोजी पुस्तक प्रकाशन कार्यक्रम
मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघ संचालित साहित्य सम्राट न. चिं. केळकर ग्रंथालय आणि हेडविग मीडिया हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सेवा संघाचे कार्यकर्ते आणि ग्रंथालयाचे कार्यवाह अरुण भंडारे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणविशेषासंबंधित लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मुकुंद कुळे यांच्या हस्ते शनिवारी (ता. १०) संध्याकाळी ५.३० वाजता सेवा संघाच्या सुविधा शंकर गोखले सभागृहामध्ये होणार आहे. कार्यक्रमाला प्रवेश मोफत असून सर्व मुलुंडकरांनी त्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

जॉर्जियाच्या दूतावासाच्या वतीने शैक्षणिक मेळावा
घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशातील अभ्यासाला गती देण्याकरिता जॉर्जियाच्या दूतावासाने जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये परदेशी शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन केले होते. भारतीय विद्यार्थ्यांना जॉर्जियातील विद्यापीठे आणि संस्थांमध्ये वैद्यकीय व गैर-वैद्यकीय अभ्यासक्रम शिकण्यासाठी धोरणात्मक सहाय्य प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर त्यात भर देण्यात आला. मुंबईनंतर बेंगळुरू आणि चेन्नईमध्येही असा मेळावा झाला. वैद्यकीय आणि विज्ञानाची पार्श्वभूमी असलेले एक हजारहून अधिक बारावी उत्तीर्ण विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com