
दैनंदिन बाजाराला पालिकेचे प्रोत्साहन
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.१ ः नवी मुंबई महापालिकेने उभारलेल्या दैनंदिन बाजार इमारतींमधील ज्या ठिकाणी विक्रेते बसलेले नसतील, असे बाजार कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा, असे आदेश पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. महापालिकेच्या ‘कोट्यवधी रुपयांच्या इमारती धूळ खात पडून’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली होती. त्यानुसार बायोमॅट्रिक सर्व्हे झालेल्या फेरीवाल्यांना प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
महापालिकेने बांधलेल्या, तसेच सद्यःस्थितीत वापर नसलेल्या इमारतींचा पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आढावा घेतला होता. या बैठकीत विभाग कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या बायोमॅट्रिक सर्व्हे झालेल्या फेरीवाल्यांची यादी प्रसिद्ध करून जागेचा लाभ घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या फेरीवाल्यांना सूचना देऊन कागदपत्रांसह कार्यालयात संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. याकरिता आवश्यक समितीचे गठण तत्परतेने करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. अशाच प्रकारे महापालिका क्षेत्रात असलेल्या विनावापर भूखंडांवर डेब्रिज व केरकचरा टाकला जात असल्यामुळे शहर स्वच्छतेत बाधा येत असल्याची बाब त्यांनी मांडली.
----------------------------------------------------
शाळांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करा
घणसोली, तसेच यादवनगर येथील शाळांच्या नवीन इमारती तत्परतेने पूर्ण करून शाळा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. तसेच पावसाळा कालावधी लक्षात घेता महापालिका इमारतींच्या, त्यातही विशेषत्वाने शाळा इमारतींच्या टेरेसवर टाकाऊ साहित्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, असेही सूचित केले आहे.
----------------------
विभागातील अधिकाऱ्यांची जबाबदारी
स्वच्छता आणि सुशोभीकरण ही आपल्या शहराची मुख्य ओळख आहे. शहर स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याचे निर्देशित करीत स्वच्छता हा विषय केवळ घनकचरा व्यवस्थापन विभागापुरता मर्यादित नाही, तर नवी मुंबई महापालिकेच्या कोणत्याही विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बैठकीत दिले आहेत.