
डोंगरी पाड्यात गटारांचा अभाव पाणी टंचाई
ठाणे, ता. १ : चालायला पायवाट नाही, गटारांची व्यवस्था नाही, त्यातच मागील तीन ते चार वर्षांपासून पाणीटंचाई अशी काहीशी परिस्थिती ठाण्यातील डोंगरी पाडा येथील असल्याची बाब मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी उघडकीस आणली आहे. बुधवारी मनसेच्या वतीने पातलीपाडा आणि डोंगरीपाडा येथील झोपडपट्टी भागाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी ही बाब उघडकीस आली.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील पातली पाडा व डोंगरी पाडा परिसरातील रहिवाशांनी पाण्यासाठी करावी लागणारी वणवण जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. मोटार लावून पाणी खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र तरी देखील पाणी पोहचत नसल्याचे दिसून आले आहे. त्यातही येथील पायवाटांची अवस्था दयनीय आहे. या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांना दोन दिवसांत या भागात आणण्याचे आश्वासन जाधव यांनी यावेळी दिले. येथील रहिवाशांना पाण्याची तीव्र समस्या जाणवत आहे. तसेच येथे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे दोन दिवसांत प्रशासनाने मार्ग न काढल्यास स्थानिक नागरिकांना घेऊन उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी दिला.