दर्याचा राजा दोन महिने किनाऱ्यांवर

दर्याचा राजा दोन महिने किनाऱ्यांवर

उरण, ता. १ ः खोल समुद्रातील मासेमारीला यांत्रिकी बोटींना १ जून ते ३१ जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे उरण तालुक्यातील समुद्र किनारे मासेमारी करणाऱ्या बोटींनी गजबजले असून उरण तालुक्यात हजारो नौका बंदरात नांगरून ठेवल्या आहेत.
उरण तालुक्याला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे तालुक्यात आगरी-कोळी बांधवांचे मासेमारीचा हा उदरनिर्वाहाचे साधन आहे. अशातच जून आणि जुलै हे दोन महिने समुद्रातील माशांच्या प्रजननाचा कालावधी असतो. तसेच या दोन महिन्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत असल्याने बोटींवरील खलाशांच्या जीविताला धोका निर्माण होत असतो. या निर्णयामुळे उरण तालुक्यातील मोरा, करंजा, दिघोडे, वशेणी, केळवणे या बंदरात हजारो मच्छीमार बोटी विसावा घेत आहेत. या दोन महिन्यांत मासेमारी बंद असल्याने मच्छीमार नौकांची डागडुजी, रंगरंगोटी आणि समुद्रात मासेमारीसाठी वापरण्यात येणारी जाळी दुरुस्ती करणे, अशा कामांमध्ये मग्न होणार आहेत.
-------------------------------------
मासेमारी बंदीच्या कालावधीवरून नाराजी
पूर्वी नारळी पौर्णिमा या दिवशी मासेमारीवरील बंदी शिथिल करण्यात येत होती; तर इतर राज्यांतील मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू होत होती. त्यामुळे बाहेरील राज्यांतील मच्छीमार महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील समुद्रात मासेमारीला सुरुवात करीत असल्याने स्थानिक मच्छीमारांचे नुकसान होत होते. त्यामुळे देशभरातल्या सर्वच किनारपट्टी भागातील मासेमारी बंदीचा कालावधीत १ जून ते ३१ जुलै असा करण्यात आला आहे.
--------------------------------------
दोन महिने आर्थिक संकटाचे
उरण तालुक्यातील करंजा, मोरा, दिघोडे व हनुमान कोळीवाडा, खोपटे, आवरे, गोवठणे, वशेणी, केळवणे या गावांतील अनेक जण खोल समुद्रात जाऊन मासेमारी करतात. मात्र आता दोन महिन्यांच्या विश्रांतीसाठी तालुक्यातील नौका सध्या करंजा, मोरा, वशेणी, केळवणे, दिघोडे या बंदरांवर नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन महिने मच्छीमारांना आर्थिक संकटाचे ठरणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com