कर्ज फेडण्यासाठी डॉमिनोजमध्ये चोरी

कर्ज फेडण्यासाठी डॉमिनोजमध्ये चोरी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : दारूसाठी उधारी आणि त्यातून तीन लाखांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने कामाच्याच ठिकाणी चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला २४ तासांच्या आत गोग्रासवाडी येथून अटक केली. विजय मनतोडे (वय २९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी दुकानाचे मॅनेजर यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रामनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बळवंत भराडे, हवालदार विशाल वाघ, सचिन भालेराव, हनुमंत कोळेकर, शिवाजी राठोड यांच्या पथकाने याचा तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुकानाबाहेर एक व्यक्ती संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी विजयचा शोध घेत सापळा रचत त्याला गोग्रासवाडी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४८ हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. दोन दिवसांची पोलिस कोठडी विजयला सुनावण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय हा डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरात राहण्यास आहे. चिपळूणकर रोडवरील डॉमिनोज पिझ्झा या ठिकाणी तो कामास होता. दारूचे व्यसन असल्याने दारू पिण्यासाठी त्याने अनेकांकडून उधार पैसे घेतले होते. उधारीचे पैसे परत करावेत, यासाठी त्याच्या दारात दररोज नागरिक उभे रहात असत. काम करत असलेल्या ठिकाणी दिवसाला मोठा गल्ला जमा होतो, हे त्याला समजले होते. त्यामुळे या ठिकाणीच हात साफ करण्याची त्याने योजना आखली होती.

--------------------
गल्ल्याची बनावट चावी बनवली
गल्ल्याची चावी घेऊन विजयने त्या पद्धतीची बनावट चावी तयार करून घेतली होती. कटावणीच्या सहायाने त्याने दुकानाचे शटर उघडले. दुकानात तिजोरी कोठे आहे हे त्याला माहीत होते. त्यामुळे तो तडक पहिल्या मजल्यावर गेला. त्या ठिकाणी त्याने चोरी करण्याआधी तेथील सीसीटीव्हीची वायर काढल्याने तो कॅमेऱ्यात कैद झाला नाही. दुकानातील ८० हजाराची रक्कम चोरून तो पसार झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com