
वाढदिवशीच मित्राची चौघांकडून हत्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : वाढदिवस साजरा केल्यानंतर डीजेचे पैसे देण्यावरून झालेल्या वादात चौघांनी मित्राला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून जब्बार मिर्झा याच्यासह एका १७ वर्षांच्या मुलाला अटक केली आहे; तर अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात राहणारा साबीर अन्सारी याचा गुरुवारी (ता. १) वाढदिवस होता. त्यामुळे त्याने मित्रांना गोवंडी परिसरातील एका हॉटेलमध्ये पार्टी दिली. त्यानंतर मित्रांनी साबीरचा वाढदिवस अधिक जोरात साजरा करण्यासाठी परिसरात डीजेचे लावला. रात्री कार्यक्रम संपल्यानंतर साबीरने मित्रांना डीजेचे पैसे देण्याची विनंती केली; मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. या सवेळी आरोपींनी साबीरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून जब्बार मिर्झा याच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.