
आजपासून धावणार मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस!
सकाळ वृत्तसेवा
मडगाव, ता. २ : गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेन आजपासून प्रत्यक्षात धावणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे, तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव प्रत्यक्ष उपस्थित राहून या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत; परंतु अजूनही वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर निश्चित नसल्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शनिवारी (ता. ३ जून) मडगांव-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे. सीएसएमटी स्थानकातून पहाटे ५.२५ वाजता सुटणारी ही वंदे भारत ट्रेन मडगावला दुपारी १ वाजून १० मिनिटांनी पोहचेल, तर परतीच्या प्रवासासाठी मडगावहून दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी निघणारी ट्रेन रात्री १० वाजून २५ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात पोहचेल. दरम्यान, ५८६ किलोमीटरचे अंतर ही गाडी ८ तासांत पार करेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम स्थानकांवर थांबा असणार आहे. उद्घाटनानंतर प्रत्यक्षपणे सर्वसामान्य प्रवाशांसाठीही वंदे भारत ट्रेन रविवारपासून धावणार आहे.
......
तिकीट दर ठरेना!
मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर प्रसार माध्यमावर व्हायरल होत आहेत. यामध्ये चेअर कारसाठी दीड हजार, तर एक्झिक्यूटिव्ह क्लाससाठी अडीच हजार रुपये तिकीट दाखवण्यात येत आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांनी या तिकीट दराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. परिणामी रेल्वे बोर्डाने सावध भूमिका घेत तिकीट दराची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे कोकणातील रेल्वे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.