
विज्ञान भारतीचे जयंत सहस्रबुध्दे कालवश
पुणे, ता. २ : विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंत श्रीकांत सहस्रबुद्धे (वय ५७) यांचे आज (ता. २) निधन झाले. मागील वर्षी झालेल्या रस्ता अपघातापासून ते आजारी होते.
सहस्रबुद्धे यांचा जन्म १७ एप्रिल १९६६ रोजी गिरगाव (मुंबई) येथे झाला. त्यांना घरातूनच संघकार्याचा वारसा मिळाला होता. वडील श्रीकांत सहस्रबुद्धे हे आजही संघकार्याशी जोडलेले आहेत. मुंबई विद्यापीठातून बी.एससी. इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर येथे काही काळ नोकरी केली. त्यानंतर १९८९ मध्ये ते नोकरी सोडून पूर्णवेळ संघ प्रचारक बनले. सहस्रबुद्धे २००९ पासून विज्ञान भारतीच्या राष्ट्रीय संघटन सचिव होते. असामान्य प्रज्ञा आणि प्रतिभेचे धनी जयंत सहस्रबुद्धे यांच्या अकाली मृत्यूची वार्ता वेदनादायक आहे. त्यांनी विज्ञान भारतीच्या कार्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते, या शब्दांत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. विज्ञानाला तळागाळापर्यंत पोहोचवणे ही या विज्ञान तपस्वीला आदरांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया परभणी एस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सहसचिव प्रसाद वाघमारे यांनी व्यक्त केली. मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.