
कल्याणात ‘निसर्गोत्सव २०२३’
कल्याण, ता. ३ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त २ ते ५ जून या कालावधीत पर्यावरण महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ श्री गणेश मंदिर, टिटवाळा परिसरात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात आला. यामध्ये पर्यावरणविषयक घोषणा, पर्यावरण गीते सादर करून पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे, हे नागरिकांना पटवून देण्यात आले.
पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले यांनी प्लास्टिक प्रदूषणावर मात कशी करायची, या संदर्भात नागरिकांना माहिती दिली; तर स्वच्छताप्रेमी नागरिक विनय तटके यांनी प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती केली. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी आपल्या भाषणात ओला-सुका कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचा वापर आणि परिसर स्वच्छता या संदर्भात मार्गदर्शन करताना उपस्थित सर्व फेरीवाले, दुकानदार, फुलवाले यांना कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिक बंदी यासंदर्भात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
डोंबिवलीतील विवेकानंद सेवा मंडळाचे अनिल मोकल यांनी उपस्थित नागरिकांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली.
महापालिका मुख्यालयात प्रदर्शन
निसर्गोत्सव २०२३ मध्ये महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते रविवारी सकाळी होणार आहे. या उपक्रमात उपस्थित राहून नागरिकांनी महापालिकेच्या पर्यावरणविषयक उपक्रमांना साथ द्यावी, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.