
संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : शिंदे गटाविषयी प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थुंकण्याची क्रिया केली होती. राऊत यांनी केलेल्या कृत्याचा शनिवारी (ता. ३) शिंदे गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेबाहेर शिवसैनिकांनी राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारत तसेच त्यावर थुंकत घोषणाबाजी केली.
डोंबिवली शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेजवळ युवा सेना महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे, डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सागर जेधे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला. या वेळी राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व संजय शिरसाट यांच्याबद्दल संजय राऊत यांनी अपशब्द वापरून तसेच त्यांच्या नावे थुंकून चुकीचे कृत्य केल्याबद्दल आंदोलन करण्यात आले. संजय राऊत यांनी या कृत्यावर आपले म्हणणे मांडले आहे. राऊत म्हणाले, गद्दारांचे नाव घेताच माझी जीभ चावली गेली. त्यामुळे मी खरोखरच थुंकलो. मात्र, गद्दारांना वाटते मी त्यांच्यावरच जाणूनबुजून थुंकलो. हे खरे आहे की महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर थुंकत आहे. त्यामुळे सतत आपल्यावर कोणी ना कोणी थुंकत आहे, अशी भीती गद्दारांना वाटत आहे. बेईमान्यांवर वीर सावरकरही थुंकले होते, हा इतिहास आहे. मी तशी कृती केली, तर चूक काय, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या कृतीवर शिवसेना महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले, रोज उठायचे आणि कोणावर तरी टीका करायची, हा राऊत यांचा नित्यक्रम झाला आहे. त्यांना लवकरच त्यांची जागा दाखवून देऊ.