पालिकेची स्वच्छता मोहीम थंडावली?

पालिकेची स्वच्छता मोहीम थंडावली?

पालिकेची स्वच्छता मोहीम थंडावली?
रस्ते अस्वच्छ; तर दिशादर्शक फलकांना फेरीवाल्यांचा बांबू

नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा

घाटकोपर, ता. ६ ः मुंबई महापालिकेने डिसेंबर महिन्यात शहरात स्वच्छता मोहिमेचा जनजागर सुरू केला होता. या मोहिमेत सर्वच क्षेत्रांतील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेत सर्व स्तरांपर्यंत ही स्वच्छता मोहीम पोहोचवण्याचा पालिकेने प्रयत्न केला. या मोहिमेचे सर्वत्र कौतुकसुद्धा झाले; मात्र घाटकोपरमध्ये या मोहिमेला फेरीवाल्‍यांकडून हरताळ फासला जात असल्‍याचे पाहायला मिळत आहे. त्‍यामुळे ही मोहीम थंडावली आहे का, असा सवाल नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांना शहरात पोषक वातावरण मिळावे यासाठी राज्य शासनाने रस्ते, भिंती, उद्याने सजवण्यासाठी कोट्यवधी खर्च केले. त्या पार्श्वभूमीतून घाटकोपर येथील मेट्रोचे खांब यांना रंगरंगोटी करून त्यावर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. तसेच भिंतींनादेखील रंग देण्यात आला आहे. प्रत्येक विभागात आरसीसी रोड बनवले जात आहेत; मात्र सौंदर्यीकरणावर एवढा भर दिला जात असताना स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांकडून मात्र बेशिस्तीचे दर्शन घडत आहे.

मेट्रो खांब आणि दिशादर्शक फलकाला ठोकले बांबू
घाटकोपर पश्चिमेकडील मेट्रोच्या खांबांना छान रंगरंगोटी व चित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळे स्टेशन परिसरात एक वेगळेच आकर्षण पाहायला मिळते; मात्र अनधिकृत फेरीवाल्यांकडून या मेट्रोच्या खांबांना बांबू तसेच बाटा शो रूमजवळ असलेल्या एका पालिकेच्या दिशादर्शक फलकालादेखील चारही बाजूंनी बांबू ठोकल्याने परिसराची विद्रूप अवस्था दिसत आहे.

आर. जे. कॉलेजसमोरील रस्ता अस्वच्छ
पश्चिमेकडील राम निरंजन झुनझुनवाला कॉलेजसमोरील जे. पी. रोड हा दरवेळी अस्वच्छ दिसतो. बहुधा पालिकेचे सफाई कर्मचारी सकाळी हा रस्ता साफ करताना दिसतात. आर. जे. कॉलेजबाहेर काही फेरीवाले बस्तान मांडून बसतात. खवय्यांकडून अनेकदा कचरा थेट रस्त्यात टाकला जातो. या रस्त्यावर फेरीवाले व दुकानदार रस्त्यावर धूळ उडू नये यासाठी सकाळ संध्याकाळी पाणी मारत असल्याने रस्त्यावरील प्लास्टिक कागद मातीवर चिपकून राहतात. त्यामुळे सकाळी सफाई कर्मचाऱ्यांनादेखील रस्ता पूर्णतः व्यवस्थित साफ करणे अवघड जाते. आठवड्यातून पाण्याचे फवारे मारून पालिकेने हा रस्ता साफ करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.


संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल. अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- गजानन बेल्लाळे, सहायक आयुक्त, एन वॉर्ड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com