
एक कोटींची विदेशी दारू जप्त
नवीन पनवेल, ता. ४ (वार्ताहर) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलजवळ कल्हेगाव येथे विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ८९ हजार ३६० रुपयांच्या मद्यासह १ कोटी १८ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
परराज्यातील बनावट मद्याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जात आहे. याच अनुषंगाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल तालुक्यातील कल्हेगाव येथे गोवा राज्यात निर्मित आणि विक्रीसाठी परवानगी असलेला तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला बनावट विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागाने सापळा रचून बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या राजशेखर परगी (४१) आणि खजा हित्तलमनी (५८, रा. हुबली, कर्नाटक) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी १८ लाख ९४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.