प्रीमियर

प्रीमियर

मुलाखत
गायत्री जाधव

ध्येय ठरवले की यश मिळतेच
अभिनेत्री गायत्री जाधव हिने काही मराठी चित्रपटांत काम केले आहे. तिचा ‘मुसंडी’ हा चित्रपट ९ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात गायत्रीने ‘राधा’ नावाची मुख्य भूमिका साकारली आहे. याबाबत तिच्यासोबत केलेली ही खास बातचीत.

‘मुसंडी’ या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
- या चित्रपटात माझी राधा नावाची भूमिका आहे. राधाचा संपूर्ण वैयक्तिक प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. तिला एम.पी.एस.सी, यू.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षा देऊन त्यात यश मिळवायचे आहे. तिचे फॅमिली बॅकग्राऊंडही तितके चांगले नाही. तिचे खरे कुटुंब तिच्यासोबत नाही. ती तिच्या वडिलांच्या मित्राकडे राहते. या तिच्या दुसऱ्या कुटुंबाचा तिला संपूर्ण पाठिंबा आहे. त्याशिवाय तिचा मित्रपरिवार तिला मदत करत असतो. राधा फार जिद्दी आहे. तिचा शहर आणि गावामधला वेगवेगळा प्रवास यामध्ये दाखवण्यात आला आहे. शहरामधल्या गर्दीचा तिच्यावर प्रभाव पडतो का, सर्व गोष्टींना ती कसे तोंड देते आणि तिच्या ध्येयामध्ये ती यशस्वी होते का? हे तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल.

या भूमिकेविषयी तुला विचारण्यात आले, तेव्हा तू काय विचार करून होकार दिलास?
- या चित्रपटाचा विषय एम.पी.एस.सी, यू.पी.एस.सी.चा आहे. आत्तापर्यंत हा विषय फार कमी चित्रपटात दाखवण्यात आला आहे. यामध्ये लव्हस्टोरी जरी दाखवण्यात आली असली तरी स्पर्धा परीक्षा हा मुख्य विषय आहे. त्यामुळे या चित्रपटाचा विषय ऐकूनच मी म्हटले की खूप वेगळा आणि छान आहे. माझ्याकडून जर समाजाला एक चांगला संदेश देता येतोय तर मी हे का करू नये? हा विचार करून मी लगेच होकार दिला.

आत्तापर्यंत अनेक चित्रपटांत प्रेमकथा पाहिल्या आहेत, या चित्रपटातल्या प्रेमकथेचे नेमके वैशिष्ट्य काय आहे?
- चित्रपटात राधा आणि गणेशची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. रोहन पाटील चित्रपटात गणेशची भूमिका साकारत आहेत. ही प्रेमकथा एकदम खरी आणि निर्मळ आहे. गणेश हा स्वतःच्या नाही, तर राधाच्या स्वप्नांसाठी झटत असतो. राधाला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असल्याने तो तिला आधार देतो. प्रेम म्हणजे फक्त रोमान्स इतकच नसते, तर एकमेकांच्या ध्येयांना, स्वप्नांना समर्थन करणे म्हणजे खरे प्रेम आहे. शहरातील आणि गावातील प्रेमामध्ये किती फरक असतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

तुझ्या खऱ्या आयुष्यात तू किती संघर्ष केला आहेस?
- खऱ्या आयुष्यातले म्हणायचे, तर करिअर, मित्र परिवार, वैयक्तिक आयुष्यात संघर्ष चालूच असतो. आपण वैयक्तिकरित्या प्रत्येकापेक्षा वेगळे असतो. त्यामुळे प्रत्येकाशी जुळवून घेणे हे थोडे कठीणच असते. मी माझ्या आजी-आजोबांच्या सानिध्यात जास्त वेळ राहिली आहे. त्यांनी माझ्यावर संस्कार केले आहेत. त्यामुळे आजच्या पिढीसोबत जुळवून घेताना मला थोडा संघर्ष करावा लागतो. मी थोडी जुन्या विचारांची आहे, जे मला पटतात. मी सुद्धा याच पिढीमधली आहे; पण त्यांची मानसिकता नाही समजत. प्रेम, नातेसंबंध, करिअर हे आताच्या पिढीमध्ये फार हलक्या प्रमाणात घेतले जाते. प्रेमच आहे, नातंच आहे तुटले तरी काय फरक पडतो, हे मला पटत नाही. कारण नाते हे कधी तुटण्यासाठी नसते. माझे जगणे थोडे वेगळे आहे. मी भावनिकदृष्ट्या खूप जोडली आहे. आताच्या पिढीत मला भावना कुठेच सापडत नाही. तोडणे हे त्यांना खूप सोपे वाटते. खरे तर ते पचवणे खूप कठीण असते. क्वचितच लोक असतील ज्यांच्यासोबत आपण जुळवून घेऊ शकतो.

ही भूमिका साकारताना कोणत्या नवीन गोष्टी तुला शिकायला मिळाल्या?
- आत्तापर्यंत आपण फक्त ऐकत आलोय एम.पी.एस.सी, यू.पी.एस.सी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणे फार कठीण असते. पण आता जसे मी आताच्या पिढीबद्दल सांगितले, तसेच शहरामध्ये सर्व गोष्टी खूप सहज उपलब्ध असतात. त्यामुळे लोकांना त्याची किंमत नसते. गावाला या सर्व गोष्टी सहज उपलब्ध नसतात, उदा. पुस्तक, कोचिंग क्लासेस इत्यादी. पण तरीही ती मुले जिद्दीने या स्पर्धा परीक्षांमध्ये पास होतात. या चित्रपटाच्या वेळी आम्ही अशा बऱ्याच मुलांना भेटलो आणि त्यावेळी या गोष्टी आम्हाला लक्षात आल्या. शहरामध्ये आई-वडिलांचा फार धाक आहे. बाहेर मुक्तपणे जगता येईल म्हणून मुले वसतिगृहात जाऊन राहतात. पण, गावी मुलांना काही ना काही काम करून, पैसे कमवूनच शिकावे लागते. काम करून पैसे कमवा किंवा शेतात काम करा. कारण काम करणे गरजेचे असते. हे सर्व कष्ट करूनही ती मुले या स्पर्धा परीक्षांत यशस्वी होतात. मला ही गोष्ट फार मोठी वाटली. आपले ध्येय आपण ठरवले की आपल्याला मार्ग मिळतात. त्यामुळे ध्येय साध्य करणे फार अवघड नसते. संयमाने गोष्टी करता येतात हे मी शिकलेय.

चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षकांकडून काय प्रतिक्रिया मिळत आहेत?
- टीझर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षकांकडून खूप उत्तम प्रतिक्रिया मिळत आहेत. जे कोणी भेटतात, ते हेच म्हणतात, ट्रेलर खूप हटके आहे. खूप सस्पेन्स वाटतोय की पुढे काय होईल. त्यामुळे उत्सुकता सर्वांनाच आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळतोय.

- संयुक्ता सातपुते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com