साकेत उड्डाण पुलाची दुरुस्ती ‘मार्गी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साकेत उड्डाण पुलाची दुरुस्ती ‘मार्गी’
साकेत उड्डाण पुलाची दुरुस्ती ‘मार्गी’

साकेत उड्डाण पुलाची दुरुस्ती ‘मार्गी’

sakal_logo
By

ठाणे, ता. ४ (वार्ताहर) : गेल्या दोन महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद असलेला साकेत उड्डाण पूल आणि मुंब्रा बायपासचे काम आता मार्गी लागले आहे. त्यापैकी साकेत उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाला असून येत्या आठवडाभरात मुंब्रा बायपासवरूनही वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे दोन्ही मार्ग पावसाळ्याआधी पूर्ण क्षमतेने खुले होणार असल्याने वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.
१ एप्रिलपासून साकेत उड्डाण पूल आणि मुंब्रा बायपास पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी खुला करावा, असे निर्देश दिलेले होते. त्यानुसार साकेत उड्डाण पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण आणि जेएनपीटीकडे जाणाऱ्या वाहतुकीला साकेत उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला केल्याने काही प्रमाणात मोठा दिलासा मिळाला आहे. साकेत पुलावरील वाहतूक चार दिवसांपूर्वी सुरू झाली असून वाहतुकीचा ताणही कमी होत आहे. उर्वरित नाशिक-मुंबई मार्गावरील १० टक्के काम रात्री ११ ते ४ या दरम्यान सुरू आहे. असे असले तरी दिवसभर या महामार्गाच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

-----------
मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर
मुंब्रा बायपास दुरुस्तीत यंदा मलेशियन अद्ययावत तंत्राचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मुंब्रा बायपास सुरू झाल्यानंतर किमान एक दशक खड्डेच पडणार नाहीत. तसेच पुलावरील सिमेंटचा थर दुप्पट करण्यात आला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे किमान दहा ते बारा वर्षे खड्डेमुक्त मुंब्रा बायपासचा प्रवास असेल, असा दावा करण्यात आला आहे.
-----------------
ठाण्याची कोंडी फुटणार
दुरुस्तीमुळे साकेत उड्डाण पूल आणि मुंब्रा बायपास पूल यामुळे यामार्गे होणारी जड-अवजड वाहने ठाणे शहराबाहेरून वळवण्यात आलेली आहेत. यामुळे दोन महिने ठाणे शहर कोंडीत अडकले आहे. या दरम्यान ऐरोली टोलनाका, पूर्व द्रुतगती महामार्गावरून जड-अवजड वाहने मार्गक्रमण करत असल्याने आणि दुसरीकडे मुंब्रा बायपास बंद असल्याने ठाणे-बेलापूर मार्ग, दिघा, कळवा आणि विटावा भागातही वाहतुकीचा चक्का जाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाहनाच्या दुतर्फा दिवस आणि रात्रीही मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, पावसाळ्याच्या तोंडावर साकेत उड्डाण पूल वाहतुकीसाठी सुरू केल्यानंतर ठाणे-बेलापूर रोड, दिघा, विटावा आदी परिसरातील वाहतूक कोंडी फुटली आहे.

----------------
खारेगाव साकेत उड्डाण पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ १० टक्के काम शिल्लक असून दोन दिवसांपूर्वी साकेत पूल वाहतुकीसाठी खुला केला आहे. दिवसभर दोन्ही लेन सुरूच राहतात; मात्र शिल्लक १० टक्के काम रात्रीच्या वेळी ११ ते ४ मध्ये करण्यात येत आहे. आठवड्यात मुंब्रा बायपासही वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
- डॉ. विनयकुमार राठोड, पोलिस उपआयुक्त, ठाणे शहर वाहतूक