
पोलिस भरतीसाठी बनावट दाखला
भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयासाठी सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त असल्याचा बनावट दाखला सादर केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या पाच जणांची निवड रद्द करण्यात आली आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयासाठी ९८६ पोलिस शिपाई व १० पोलिस चालक शिपाई पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी ५० पदे व भूकंपग्रस्तांसाठी २१ पदे आरक्षित ठेवण्यात आली आहेत. भरतीसाठी ७२ हजार अर्ज प्राप्त झाले होते. मैदानी व लेखी अशा दोन्ही परीक्षेत प्राप्त गुणांनुसार ९९६ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रकाशित करण्यात आली होती.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या भरती प्रक्रियेतील प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त या आरक्षणांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी दिले होते. त्यानुसार बीड व धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन अधिकारी कार्यालयाकडून प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात फिरोज जहाँगीर पिंजारी (वय २९, धुळे), अमोल चंदु दिपके (वय २९, हिंगोली), तुकाराम अण्णा नैराळे (वय २७, बीड), कानिफनाथ कचरू पाखरे (वय २५, बीड), चंद्रकांत सर्जेराव हिंदुळे (वय २६, बीड) या पाच उमेदवारांनी प्रकल्पग्रस्त असल्याचा बनावट दाखला तयार करून अर्जासोबत जोडला असल्याचे उघड झाले. त्यांच्याविरोधात काशिमीरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
----------------
निवड झालेल्या उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.
- श्रीकांत पाठक, अतिरिक्त पोलिस आयुक्त