वरीष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे सक्तीच्या रजेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरीष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे सक्तीच्या रजेवर
वरीष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे सक्तीच्या रजेवर

वरीष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे सक्तीच्या रजेवर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : महिलेचा विनयभंग केल्याचा ठपका ठेवत भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोशी यांच्यावर गुन्हा दाखल होताच भाजपच्या वतीने मानपाडा पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली करा, अशी मागणी केली होती. यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार बागडे यांना शुक्रवारपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती आणि डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर एका महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. जोशी यांच्यावर गुन्हा दाखल होताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी कोणतीही सखोल चौकशी न करता पोलिसांनी हा गुन्हा राजकीय दबावामुळे दाखल केला असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
शेखर बागडे हे सत्ताधारी पक्षातील एका वरिष्ठ नेत्याच्या जवळचे असल्याची चर्चा कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण या परिसरात आहे. मुंब्रा येथून बदली होऊन आल्यानंतर बागडे यांनी आपला चांगलाच दबदबा निर्माण केला; मात्र एकाच पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना ते जुमानत असल्याने भाजप व मनसे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत नाराजी असल्याची जोरदार चर्चा होती. भाजपचे डोंबिवलीतील वरिष्ठ नेते यांनाही बागडे यांनी नाराज केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच गुन्हा दाखल होताच भाजपने आंदोलन करत बागडे यांची कोंडी केली. त्यामुळे शुक्रवारपासून बागडे यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले आहे. याचे पुष्टीकरण अद्याप मिळालेले नसले तरी याविषयी चर्चा मात्र सुरू आहे.