
चित्रकार निशिकांत पालांडे यांचा आजपासून आध्यात्मिक कलाविष्कार
चित्रकार निशिकांत पालांडे यांचा आजपासून आध्यात्मिक कलाविष्कार
मुंबई, ता. ५ ः नवी मुंबईतील तरुण चित्रकार निशिकांत पालांडे यांनी ‘साधना’ या विषयावर सादर केलेल्या नवनिर्मित आध्यात्मिक चित्रांचे प्रदर्शन मुंबईत वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन सहा ते १२ जूनदरम्यान दुपारी ११ ते सात या वेळेत कलाप्रेमींना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (ता. ६) सायंकाळी साडेचार वाजता जगप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, श्री स्वामी परमप्रेमजी यांच्यासहित कला व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. चित्रकार निशिकांत पलांडे हे नवी मुंबईत वास्तव्यास असून त्यांनी आपले कलेचे शिक्षण जे. जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्टमधून पूर्ण केले आहे. निशिकांत यांना अनेक नामांकित संस्था व प्रदर्शनांतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून चित्रकलेतील अनेक माध्यमांत त्यांचा हातखंडा आहे. ‘साधना’ हा देवावरील माणसाच्या विश्वासाचा प्रवास आणि प्रत्येक मनुष्याचा ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास त्यांच्या चित्रातून व्यक्त होतो. व्यक्तिचित्रण (पोर्ट्रेट) हा विषय निशिकांत यांच्या अगदी जवळचा आहे आणि येथे तो कॅन्व्हासवर व्यक्तिचित्रासह ते या प्रवासाबद्दल दाखवत आहेत. त्यांच्या या प्रदर्शनातील चित्रे भारतीय संस्कृतीची प्रतीके म्हणून आपल्याला जाणवतात. ‘साधना’ या चित्रप्रदर्शनात त्यांनी साकारलेली आध्यात्मिक तसेच साधूंच्या साधनेवर आधारित व्यक्तिचित्रे रसिकांच्या हृदयाला आणि मनालाही स्पर्श करतील. हे प्रदर्शन १२ जूनपर्यंत रसिकांना विनामूल्य पाहता येईल.