
तडीपार आरोपी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला आरोपी तुर्भे स्टोअर्स भागात आढळून आला होता. अविनाश राठोड (२९) असे या आरोपीचे नाव असून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याला पुन्हा गजाआड केले आहे.
तुर्भे स्टोअर्समधील के. के. आर. रोड भागात राहणाऱ्या आरोपी अविनाश राठोडवर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात मारामारी, चोरी, जबरी चोरी यासह इतर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अविनाश राठोड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर परिमंडळ-१ च्या पोलिस उपआयुक्तांनी ऑगस्ट २०२२ मध्ये त्याला मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. तसेच त्याला त्याच्या इच्छेनुसार दुसऱ्या जिल्ह्यात सोडण्यात आले होते; मात्र हद्दपारीचा कालावधी संपला नसताना १ जून रोजी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तुर्भे स्टोअर्समधील आपल्या घरी आला होता. याबाबतची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री सव्वाआठच्या सुमारास तुर्भे स्टोअर्समधून त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याविरोधात मुंबई पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.