जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आरे’मध्ये स्वच्छता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आरे’मध्ये स्वच्छता अभियान
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आरे’मध्ये स्वच्छता अभियान

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आरे’मध्ये स्वच्छता अभियान

sakal_logo
By

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आरे’मध्ये स्वच्छता अभियान
जोगेश्वरी, ता. ५ (बातमीदार) ः ‘स्वच्छ आरे, सुंदर आरे’ अशी भावना बाळगत निसर्गरम्य असे वातावरण लाभलेल्या तसेच मुंबईचे फुप्फुस अशी ओळख असलेल्या आरेमध्ये जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांच्‍या मार्गदर्शन व उपस्थितीत सोमवारी (ता. ६) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या वेळी सुमारे ५० टन कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरेमध्ये स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आमदार वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या के-पूर्व, पी-दक्षिण, ऑबेरॉय स्प्लेंडरचे रहिवसी, विविध सामाजिक संस्था, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आरे प्रशासनाचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून आरेच्या विविध भागांमध्ये आदर्शनगर, गौतम नगर, न्यूझीलंड हॉस्टेल, मयूर नगर, विविध पाडे व युनिटमध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. आमदार वायकर स्वयंसेवी संस्था, दत्तकवस्ती योजना, पालिकेचे सफाई कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत शिवसेना उपनेते व युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा नारळ वाढवण्यात आला.

प्लास्‍टिकचा कचरा अधिक
स्वच्छता मोहिमेत आरेच्या विविध भागांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्या तसेच विविध भागांमध्ये कचरा साठल्याचे चित्र दिसून आले. मनपाच्या पी-दक्षिण व के-पूर्व विभाग कार्यालयाने जेसीबी व डम्परच्या साह्याने मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला. आमदार वायकर यांनी कचऱ्याचे सुमारे ५० डब्बे व कचरा गोळा करायच्या पिशव्या दिल्या होत्या. पी-दक्षिण विभागाने प्लास्टिक सुका कचरा (दोन टन), मिक्स कचरा (१२ टन) व डेब्रिज (२० टन) असा कचरा गोळा केला. ऑबेरॉय स्प्लेंडरमधील रहिवाशांनी तसेच क्लीन आरेचे जल्पेश मेहता व त्यांच्या टीमने तसेच ऑबेरॉय इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य व विद्यार्थ्यांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभागी घेतला होता. या मोहिमेत पी-दक्षिणचे सहायक अभियंता तुषार पिंपळे, दुय्यम अभियंता संदीप माटेकर, सहायक मुख्य पर्यवेक्षक श्याम शिंदे, पर्यवेक्षक रवी लोखंडे, उपअभियंता के पूर्वचे विनायक आवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.