अंधारात चाचपडण्याची प्रवाशांवर वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधारात चाचपडण्याची प्रवाशांवर वेळ
अंधारात चाचपडण्याची प्रवाशांवर वेळ

अंधारात चाचपडण्याची प्रवाशांवर वेळ

sakal_logo
By

जुईनगर, ता. ५ (बातमीदार)ः जुईनगर रेल्वेस्थानकातून डी मार्टच्या दिशेने बाहेर पडताना अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. रेल्वेस्थानकाबाहेरील पथदिव्यांची सुविधा नसल्याने रेल्वेस्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांवर अंधारात चाचपडत जाण्याची वेळ आली आहे.
नवी मुंबईतील अत्यंत गजबजलेले रेल्वेस्थानक म्हणून जुईनगरची ओळख आहे. पूर्व तसेच पश्चिमेकडील प्रवासी या ठिकाणावरून मुंबई, तसेच उपनगरात प्रवास करतात. शिरवणे, नेरूळ या विभागांतून हजारो नागरिक जुईनगर रेल्वेस्थानकातून दररोज प्रवास करतात. त्यामुळे नेहमी प्रवाशांची वर्दळ असलेल्या रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या स्थानकाच्या बाहेर विजेची सुविधा उपलब्ध नसल्याने संपूर्ण परिसरामध्ये अंधार पसरला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी घरी परतणाऱ्या तरुण मुली, महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच या अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीती आहे.
--------------------------------------
दुर्घटना घडण्याची शक्यता
जुईनगर रेल्वेस्थानकाच्या बाहेर असलेल्या या अंधाराकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी सिडको प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रेल्वेस्थानकाच्या बाहेर विद्युत व्यवस्था सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी केली जात आहे.
-------------------------------------
जुईनगर रेल्वेस्थानकातून बाहेर पडताना काळोखाशी सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी महिलांना अंधारातून वाट काढताना भीती वाटते. तसेच चोरीचे प्रमाण वाढले आहे.
- सुनीता साळे, प्रवासी
-----------------------------------------
जुईनगर रेल्वेस्थानकातील विद्युत व अन्य वेगवेगळ्या समस्यांबाबत सिडको प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत.
- लक्ष्मण दास, रेल्वे स्टेशन व्यवस्थापक, जुईनगर