भिवंडीत निरोगी मातृत्व संगोपनासाठी ‘आंचल’

भिवंडीत निरोगी मातृत्व संगोपनासाठी ‘आंचल’

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : शहरामध्ये सुरक्षित आणि निरोगी मातृत्वाचे संगोपन करण्यासाठी आणि त्यातून मातामृत्यू व बालमृत्यू रोखता यावेत, यासाठी अनोखी मोहीम सुरू करण्यात आली आहे. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांच्या कार्यालयामार्फत ‘आंचल’ नावीन्यपूर्ण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेतून सध्याच्या घडीला ३५० महिलांना विविध स्वरूपात वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
‘आंचल’ उपक्रमात गरोदर आणि बाळाला दूध पाजणाऱ्या मातांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आवश्यक तपासण्या व औषधोपचार देण्यात येत आहे. या मातांना सेवा देण्यासाठी शहरात जागोजागी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये तज्ज्ञांकडून आहारविहार आणि तपासण्यांविषयी मार्गदर्शन करण्यात येते. शहरामध्ये जनजागृतीचा अभाव, अपुऱ्‍या पायाभूत आरोग्य सुविधा, आर्थिक संसाधनांचा अभाव इत्यादींमुळे मोठ्या प्रमाणात घरीच प्रसूतीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आधीच प्रसूती झालेल्या महिलांना स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिलेली औषधे, पौष्टिक आहार, वाहतूक साहाय्य आणि इतर औषधी मदत देऊन त्यांना उत्तम सुविधा आमदार रईस शेख यांच्या कार्यालयातून ‘आंचल’ मोहिमेतून पुरवली जात आहे. सध्याच्या घडीला सुमारे ३५० गर्भवती महिलांना विविध स्वरूपात वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. त्यामुळे यशस्वी सुरक्षित आणि निरोगी प्रसूती झाल्या आहेत.
....
असा आहे उपक्रम
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला, कॅल्शिअम आणि लोहाची कमतरता असलेल्या महिलांसह ७ ते ९ महिन्यांच्या गर्भवतींना मातृत्व सुरक्षा सुविधा प्रदान करण्याचे आंचलचे उद्दिष्ट आहे. यासाठी महिलांना नागरी आरोग्य केंद्राच्या आशा सेविकांकडे अथवा आरोग्य सेविकेकडे नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना ‘आंचल किट’ प्रदान केले जाईल. या किटमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिलेल्या फॉलिक अॕसिड, कॅल्शिअम गोळ्या आणि प्रथिने समाविष्ट आहेत. नोंदणीकृत प्रत्येक महिलेला आंचल कार्ड दिले जाते, ज्यामुळे त्या महिलेने घेतलेल्या आरोग्य आणि सुविधांचा व्यवस्थित पाठपुरावा करण्यात येईल. आंचल या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेची एक वेळ सोनोग्राफी करण्यात येणार असून सोनोग्राफीचा संपूर्ण खर्च कार्यालयाकडून केला जाणार आहे.

दर रविवारी जनजागृती मोहीम
नवजात बालकाचे जन्मप्रमाणपत्र मिळवण्यासाठी या उपक्रमातून मदत केली जाते. तसेच एक टोल-फ्री नंबर प्रदान केला गेला आहे, याद्वारे रुग्णवाहिका, इतर आवश्यक सुविधा दिल्या जात आहेत. तसेच या उपक्रमांतर्गत प्रत्येक रविवारी प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञांद्वारे जनजागृती मोहीम आयोजित करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com