
Maval Lok Sabha: CM शिंदेंची डोकेदुखी वाढली! मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपची मोर्चेबांधणीला सुरूवात
पनवेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये गरिबांना दरमहा धान्य, चार कोटी कुटुंबांना घरे, पाच कोटी नागरिकांना मोफत उपचार, ग्रामीण भागात १२ कोटी घरांमध्ये पाणी देण्याबरोबरच फेरीवाले, नवउद्योजकांना प्रोत्साहन दिले आहे.
या योजना जनमानसात पोहोचण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात मोदी @९ महाजनसंपर्क अभियान सुरू केल्याची आल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजपतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मोदी @९’ कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी कार्याची माहिती देण्यासाठी भाजपाच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद झाली.
यावेळी मोदी सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी विकास तीर्थ, डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर यांचे प्रबुद्ध नागरी संमेलन, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोदी सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठींबा देणाऱ्यांचे सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर संमेलन.
विशाल रॅली, जाहीर सभा, योग दिन, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, लाभार्थी संमेलन, व्यापारी संमेलन, व्हर्च्युअल रॅली, घरोघरी संपर्क अभियान, संयुक्त मोर्चा संमेलन असे विविध कार्यक्रम होणार असल्याचीही माहिती संजय भेगडे यांनी दिली.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली असून महासंपर्क अभियानातून नागरिकांशी संवाद साधला जाणार असल्याचे मत व्यक्त केले.