
दृष्टीक्षेप
वाहतूक पोलिसांकडून वृक्षारोपण
घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) ः जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधत गांधी नगर येथे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष वारंग यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणात होणारे सततचे बदल आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेत अधिकाधिक झाडे लावणे हाच पर्यावरण वाचवण्यासाठी पर्याय असल्याचे मत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष वारंग यांनी या वेळी व्यक्त केले. या वेळी रिक्षाचालक व नागरिकांना वृक्षवाटप केले, तसेच वाहतूक विभागाच्या कार्यालय परिसरातदेखील वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती
मालाड, ता. ६ (बातमीदार) ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सांताक्रूझ पश्चिम येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल तसेच वन महाराष्ट्र नेव्हल युनिट यांच्यातर्फे विविध कार्यक्रम राबवण्यात आले. याप्रसंगी जुहू समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी जुहू समुद्र किनाऱ्यावर सफाई करत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा गोळा केला. तसेच या विद्यार्थ्यांनी जुहू गार्डन येथे जाऊन तेथील कचराही उचलला, तसेच वृक्षारोपण करत ‘जीवन जगवा’चा संदेश देत सायकल रॅली काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वसामान्यांना देत पर्यावरण दिवस उत्साहात साजरा केला. याप्रसंगी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच सामान्य नागरिकांचा या कार्यक्रमात सहभाग होता.
नांदेड हत्याकांडाच्या निषेधार्थ निदर्शने
कांदिवली, ता. ६ (बातमीदार) ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने रविवारी (ता. ४) दहिसर रेल्वे स्थानक या ठिकाणी जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निदर्शने करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील बांडोरा हवेली या गावात अक्षय भालेराव या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच भारत सरकारने अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी द्यावी, नुकसान भरपाई म्हणून ५० लाख रुपये द्यावे, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालू व्हावा, अशा मागण्यांचे निवेदन वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. या आंदोलनामध्ये हरिहर यादव, ॲड. अभिया सोनवणे, उषा रामलू, सिद्धार्थ पवार, अनिल कोकणे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अक्षय भालेराव हत्येविरोधात आंदोलन
धारावी, ता. ६ (बातमीदार) : नांदेड येथील अक्षय भालेराव याची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्याच्याविरोधात मुंबईतील सामाजिक संघटनांनी दादर (पूर्व) येथे निदर्शने करत आंदोलन केले. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जागृत पर्यावरण समितीतर्फे मोहीम
मालाड, ता. ६ (बातमीदार) ः पर्यावरण दिनानिमित्त अंधेरी स्थानकाबाहेर जनजागृती मोहीम राबवण्यात आली. जागरुक पर्यावरण समितीचे अध्यक्ष अमजद खान यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर पर्यावरणाविषयी नागरिकांना माहिती दिली आणि ते वाचवण्याचा संकल्पही केला. झाडे आणि पर्यावरणाविषयी माहिती देत गुलाबाचे फूल आणि पाणी देऊन लोकांना जागरुक करण्याचे काम केले. सुमारे तीन हजार नागरिकांनी पर्यावरण वाचवण्याची शपथ घेतली. रेल्वे स्थानकावरून येणाऱ्या नागरिकांनी अमजद खान यांच्या या प्रयत्नांचे कौतुक करत पर्यावरण वाचवण्यासाठी नक्कीच हातभार लावणार असल्याचे आश्वासन दिले.