प्रीमियर

प्रीमियर

समर कुबेरच्या भूमिकेत अशोक फळदेसाई
बहीण-भावाचे अनोखे नाते ‘कस्तुरी’ या नव्या कोऱ्या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. ही मालिका कलर्स मराठीवर लवकरच सुरू होणार आहे. आईनंतर निःस्वार्थ प्रेम करणारे कोणी असेल तर ती फक्त बहीणच असते. या मालिकेतील कस्तुरी आणि नीलेशचे नाते असेच घट्ट आहे. नीलेश हा कस्तुरीचा धाकटा भाऊ. समर कुबेर याच्या पक्षात तो कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. या मालिकेत कुबेरची भूमिका अशोक फळदेसाई साकारणार आहे. भूमिकेबद्दल बोलताना अशोक म्हणाला, ‘कलर्स मराठीवर पुन्हा एकदा काम करणे म्हणजे माझ्यासाठी घरी परत आल्यासारखेच आहे. यावेळी पहिल्यांदा मी पूर्णपणे वेगळ्या ढंगाची आणि बाजाची भूमिका करतोय. कलर्स मराठीसारख्या प्लॅटफॉर्मवर अशी भूमिका साकारालया मिळतेय, याचा मला खूप आनंद आहे. आताची भूमिका ही आधीच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. या पात्रासाठी मी खूप तयारी केली आहे आणि करतोय. तुम्हा सर्वांनाही बघायला खूप आवडेल याची मला खात्री आहे. समर कुबेर या पात्राबद्दल सांगायचे झाले तर तो खूप स्मार्ट, शिकलेला श्रीमंत घरातला आहे. त्याचा घरच्यांवर खूप जीव आहे. सर्वांना मान देणारा, फॅमिली बिझनेस सांभाळणारा आहे. राजकारणात प्रचंड रस असल्याने तो एक निःस्वार्थी राजकारणीही आहे. लोकांची सेवा करणारा, अडल्या नडल्यांना मदत करणारा आहे. विचार करून निर्णय घेणारा असे हे समर कुबेरचे पात्र आहे. दुप्पट ऊर्जा घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय’.
................
कोटींच्या बजेटमध्ये ‘शक्तिमान’ची निर्मिती
‘शक्तिमान’ हा ९० च्या दशकातील सर्वांचा आवडता सुपरहिरो आहे. लवकरच यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शक्तिमान’ ही भूमिका मुकेश खन्ना साकारायचे. आता हा ‘शक्तिमान’ प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मुकेश खन्ना यांनी गेल्या वर्षी सोनी पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत ‘शक्तिमान’ सिनेमाची घोषणा केली होती. सोनी पिक्चर्सने एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात घोषणा केली होती. मुकेश खन्ना ‘शक्तिमान’बद्दल म्हणाले की, ‘शक्तिमान’ या बिग बजेट सिनेमावर सध्या काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा सिनेमा असेल. २००-३०० कोटींच्या बजेटमध्ये या बहुचर्चित सिनेमाची निर्मिती होत आहे. स्पायडर मॅनची निर्मिती करणारे सोनी पिक्चर्स ‘शक्तिमान’ची निर्मिती करत आहेत. कोरोना महामारीमुळे या सिनेमाचे चित्रीकरण पुढे ढकलले होते. चित्रपटाची स्टारकास्ट काय असेल, कोण दिग्दर्शित करणार हे लवकरच समोर येईल’. मुकेश खन्ना सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर आहेत. आता त्यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ‘शक्तिमान’चे चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
..................
‘द नाईट मॅनेजर २’ लवकरच भेटीला
‘द नाईट मॅनेजर २’ या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची सीरिजबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन ३० जूनपासून डिज्नीप्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपालासह तिलोत्तमा शोम, रवी बहल, शाश्वत चॅटर्जी हे कलाकार या सीरिजमध्ये दिसणार आहेत. तर दिग्दर्शन प्रियांका घोष आणि संदीप मोदीने केले आहे. ‘द नाईट मॅनेजर’मध्ये अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर ही सुपरहिट जोडी होती. पहिला सीझन संपल्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये काय होणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. थरारनाट्य असणाऱ्या ‘द नाईट मॅनेजर २’ या सीरिजमध्ये अनेक रहस्यमय गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. अनिल कपूरने ‘द नाईट मॅनेजर २’चा ट्रेलर शेअर करत लिहिले, ‘शैलीची लंका जाळण्यासाठी शान तयार आहे. बहुचर्चित वेबसीरिजचा शेवट लवकरच समोर येणार’. पहिल्या सीझनपेक्षा दुसरा सीझन अधिक नाट्यमय, क्रूर आणि उत्साहवर्धक असणार आहे.
..............
तमन्नाच्या ‘जी करदा’ मुहूर्त ठरला
सध्या तमन्ना भाटिया तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. लवकरच तिची ‘जी करदा’ ही बहुप्रतिक्षित वेबसीरिज १५ जूनला ॲमेझॉन प्राइम व्हिडीओजवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचे कथानक सात मित्रांच्या आयुष्यावर आधारित आहे. जेव्हा हे ३० वर्षांचे होतात, तेव्हा त्यांना जाणवते की जीवन त्यांच्या कल्पनेच्या बाहेरचे आहे. ७ मित्रांचा प्रवास आणि त्यांची अविश्वसनीय मैत्री या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. यामध्ये तमन्ना भाटिया, आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, अन्या सिंग, हुसैन दलाल, सायन बॅनर्जी आणि सामवेदना सुवाल्का हे सात मित्रांच्या भूमिकेत आहेत. त्याशिवाय सिमोन सिंग आणि मल्हार ठकर प्रमुख भूमिकेत आहेत. ही वेबसीरिज अरुणिमा शर्मा लिखित आणि दिग्दर्शित, हुसेन दलाल, अब्बास दलाल सह लिखित आहे. जिची निर्मित दिनेश विजानच्या मॅडॉक फिल्म्स ने केली आहे. ही आठ भागांची वेबसीरिज असणार आहे.
...............
‘बाल शिवाजी’ चित्रपटाची पहिली झलक
‘बाल शिवाजी’ चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. घोषणा केल्यापासूनच शिवप्रेमी आणि सिनेप्रेमींमध्ये या त्याची उत्सुकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकानिमित्त ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना पाहण्यास मिळाली आहे. चित्रपटात ‘बाल शिवाजी’च्या भूमिकेत आकाश ठोसर दिसणार आहे. आकाशने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले, ‘लहान असो वा मोठा; वाघ हा ‘वाघच’ असतो. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पायाभरणीची अद्‍भूत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर’. आकाश ठोसरच्या या पोस्टवर जय शिवराय, जगदंब, जय भवानी जय शिवाजी, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे आई-वडील, जिजामाता आणि शहाजी राजे भोसले यांनी भक्कम पाया रचून दिलेले अमूल्य योगदान दाखवेल. तसेच शिवराय लहानपणापासूनच एक योद्धा आणि शासक म्हणून त्यांची कौशल्ये कशी तीक्ष्ण झाली हे दाखवेल’. शिवरायांच्या आयुष्यात १२ ते १६ वर्षांपर्यंत घडलेल्या रंजक गोष्टी या चित्रपटात पाहायला मिळतील. त्यामुळे आता छत्रपती शिवरायांच्या बालपणीचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com