मिरा-भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामाची रखडपट्टी

मिरा-भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामाची रखडपट्टी

भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात दहिसर चेकनाका ते भाईंदर पश्चिम या प्रमुख मार्गावर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे; परंतु मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांना पडलेले खड्डे, उघडी गटारे, रस्त्यावर पडलेला राडारोडा आदी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे; मात्र ही कामे अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे चार दिवसांत पूर्ण करा; अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांनी दहिसर ते मिरा-भाईंदर या मेट्रो मार्ग क्र ९ च्या कामाची मंगळवारी (ता. ६) पाहणी केली. या वेळी आमदार गीता जैन, मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, मेट्रोचे संचालक प्रमोद आहुजा, मेट्रो कामाच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील, महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित आदी उपस्थित होते. मेट्रोचे काम गेली तीन वर्षे सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. यामुळे अपघात होत आहेत. मेट्रोच्या कामाचे साहित्य, डेब्रिज रस्त्याच्या कडेला पडून आहे. यावर आमदार सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

-----------
मेट्रोच्या कामामुळे खराब झालेले सगळे रस्ते पावसाळ्यापूर्वी चांगले करावेत, रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये, महामार्गाजवळ पडलेली माती आणि पाईप हटवून वाहतुकीला होणारा अडथळा दूर करावा, ठिकठिकाणी पडलेले डेब्रिज हटवावे, अडथळा ठरणारे साहित्य रस्त्यातून हटवावे अशा सूचना आमदार प्रताप सरनाईक यांनी केल्या. पुढील १० दिवसांत कामे पूर्ण झाली पाहिजेत; अन्यथा अधिकाऱ्यांची तक्रार एमएमआरडीए आयुक्तांकडे केली जाईल, असे सांगत आमदार सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

--------------
कामे पूर्ण करण्याचे आश्वासन
मेट्रोच्या कामांमुळे जी गटारे, नाले तुटले असतील किंवा कामे अर्धवट असतील, तर ती कामे पावसाच्या आधी केली जातील. रस्तेदेखील चांगले केले जातील. दिलेल्या सर्व सूचनांचे लवकरात लवकर पालन करून सगळी कामे करू व नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊ, अशी ग्वाही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी या वेळी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com