Thane Crime: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मोठा शस्त्रसाठा जप्त; गुन्हे शाखेच्या कारवाईत १७ पिस्तूल हस्तगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police
ठाण्यात मोठा शस्त्रसाठा जप्त

Thane Crime: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मोठा शस्त्रसाठा जप्त; गुन्हे शाखेच्या कारवाईत १७ पिस्तूल हस्तगत

sakal_logo
By

ठाणे : ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात प्राणघातक शस्त्राच्या धाकावर नोंद होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत पोलिस पथकाने दोघा आरोपींना अटक करत त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला.

अटक आरोपींकडून १७ पिस्तूल, ३१ मॅग्झीन व १२ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. अटक आरोपींमध्ये रमेश मिसरिया किराडे ऊर्फ विलाला (वय २५), मुन्ना अमाशा अलवे ऊर्फ बारेला (वय ३४) दोन्ही आरोपी राहणार जिल्हा बुम्हानपूर, मध्य प्रदेश राज्यातील आहेत.

या आरोपींची मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (१ जून) अंगझडती घेतली असता आरोपीच्या पाठीवर असलेल्या सॅकमध्ये ३ देशी बनावटीचे पिस्तूल, ६ मॅग्झीन, ४ जिवंत काडतुसे, एक मोबाईल फोन असा ऐवज सापडला.

पोलिस पथकाने आरोपीविरोधात राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत अधिक चौकशी केली असता ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईसारख्या शहरातील गुन्हेगारांना प्राणघातक शस्त्रांची विक्री हे आरोपी करीत असल्याचे समोर आले.

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून गावठी कट्टे विक्रीचा व्यवसाय हे करत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सखोल चौकशी करत दोघा आरोपींकडून देशी बनावटीची १७ पिस्तूल, ३१ मॅगेझीन आणि १२ जिवंत काडतुसे हस्तगत केली. गुन्हे शाखा मालमत्ता विभागाची ही मोठी कारवाई आहे.

टोळी सहभागी असल्याची शक्यता
अटक केलेले आरोपी रमेश व मुन्ना हे दोघेही सराईत आरोपी आहेत. १ जून रोजी पोलिसांनी आरोपींच्या माहितीवरून महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवरील पाचोरी टुनकी भागातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने १ अवैध देशी बनावटीचे पिस्तूल, २५ मॅग्झीन व ८ जिवंत काडतुसे हस्तगत केले होते. या शस्त्र तस्करीत टोळीचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना असून चौकशीत तब्बल १४ देशी पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केलेली आहेत.