एसआरए प्रकल्पातील लाभार्थ्यांचे जीव टांगणीलाच

एसआरए प्रकल्पातील लाभार्थ्यांचे जीव टांगणीलाच

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : ठाणे शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारतींचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्याचा प्रत्यक्ष नारळ अखेर फुटला आहे. दुसरीकडे मोडकळीस आलेल्या इमारती व झोपडपट्टीतून उंच टॉवरमध्ये जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एसआरए लाभार्थ्यांचा मात्र जीव अद्यापही टांगणीलाच लागला आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात असलेल्या त्या १६ प्रकल्पांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

ठाणे शहरातील काही भागांत कित्येक वर्षांपासून धोकादायक अनधिकृत इमारतीत रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. या रहिवाशांना हक्काचे घर मिळावे यासाठी क्लस्टर योजनेला मंजुरी देण्यात आली. त्याचा फटका दृष्टिपथात असलेल्या एसआरए योजनेला बसला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात क्लस्टरचे ४४ यूआरपी तयार करण्यात आले असून त्यापैकी ७ यूआरपीचे नकाशे अंतिम करण्यात आले आहेत; तर उर्वरित यूआरपी अद्यापही अंतिम झालेले नाहीत. असे असतानादेखील अनेक ठिकाणी क्लस्टरचे आरक्षण टाकण्यात आल्यामुळे एसआरएसह पुनर्विकासाच्या छोट्या इमारतींनादेखील अडसर ठरत असल्याचे दिसत आहे. शहरातील १९९ झोपडपट्ट्यांपैकी ११२ झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी महापालिकेने क्लस्टर योजना राबवण्याचे निश्चित केले आहे. यातील अनेक झोपडपट्ट्यांचा एसआरएच्या माध्यमातून सर्व्हे झालेला आहे, काहींची कामेही सुरू झाली आहेत. काहींच्या ठिकाणी नागरिकांना भाडे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; तर तब्बल १६ प्रकल्पांच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून हे सर्व प्रकल्प यूआरपीमध्ये येत असल्याने या प्रकल्पांच्या पुढच्या प्रक्रियेलाच ब्रेक लागला आहे. या प्रकल्पासंदर्भात आमदार संजय केळकरांसह आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आवाज उठवला होता. दरम्यान, क्लस्टर योजनेच्या भूमिपूजनाच्या वेळेस केळकर यांनी क्लस्टरच्या फेऱ्यात अडकलेल्या त्या १६ प्रकल्पांनाही दिलासा द्यावा, अशी मागणीदेखील केली. त्यानुसार त्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

...................................
रखडलेले एसआरए प्रकल्प
पाचपाखाडी, चेंदणी कोपरी, माजिवडे, कोपरी (ठाणेकरवाडी), पाचपाखाडी (सर्व्हे नं. ४४७ पैकी ४४८), मौजे ठाणे, भीमनगर (वर्तकनगर), मौजे पाचपाखाडी (प्लॉट नं. ३९२), मौजे ठाणे (मार्क्स नगर, आंबेघोसाळे तलाव, मीनाताई ठाकरे चौक), नौपाडा (बी केबिन), मौजे ओवळा, चरई, मौजे पाचपाखाडी (भूमापन क्रमांक १६३/३/ ब), मौजे चेंदणी (नगर भूमापन क्रमांक ९६० ते ९७९).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com