राज्यात हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट

राज्यात हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट

मुंबई, ता. ६ : गेल्या दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत २० टक्के घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२१ मध्ये राज्यात एकूण १९,३०३ हिवतापाचे रुग्ण आढळून आले. २०२२ मध्ये राज्यात एकूण १५,४५१ रुग्ण आढळले. मागील वर्षाच्या तुलनेत रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी घट आढळली आहे.

२०२३ मध्ये मेअखेर राज्यात एकूण २,५७१ रुग्ण आढळले. त्याची तुलना गेल्या वर्षीच्या मे अखेरपर्यंतच्या रुग्णांशी केल्यास २० टक्क्यांनी घट झाली आहे. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी हिवतापाचे प्रमाण कमी करण्यासाठी केलेल्या राज्यभरातील उपाययोजनांना रुग्ण घटण्याचे श्रेय दिले आहे.

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २०३० पर्यंत हिवतापाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २१ डिसेंबर २०२१ रोजी हिवताप रोगाची नोंद करण्यात आली. राज्यात २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन साजरा केला जातो. त्याअंतर्गत नवीन हिवताप रुग्ण शोधण्यासाठी राज्यातील सर्व पाडे, वाड्या, वस्त्या आणि गावपातळीवर कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण केले जाते.

कीटकनाशकांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करून राज्यात योग्य डास उत्पत्तिस्थळांमध्ये डास अळीभक्षक गप्पी मासे सोडण्यात येतात. अशा उपाययोजना ग्रामीणसह शहरी भागातही आहेत. राज्यात आतापर्यंत ११,०१८ गप्पी मासे पैदास केंद्रांची निर्मिती केली गेली आहे. योग्य अशा १,१२,११८ डासोत्पती स्थानांत मासे सोडण्यात आले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. बी. एस. कमलापूरकर म्हणाल्या, की राज्यातील ३४ पैकी ३३ जिल्ह्यांमध्ये वार्षिक रोगजंतू निर्देशांक (एपीआय) एक टक्क्यापेक्षा कमी आहे. दरम्यान, सर्वाधिक रुग्णसंख्या आदिवासी लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आहे.


पाच जिल्ह्यांमध्ये शून्य नोंद
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली अशा पाच जिल्ह्यांमध्ये हिवतापाचे शून्य रुग्ण आढळले आहेत. भंडारा, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, वर्धा, नगर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, वाशीम, सांगली, बीड, सोलापूर इत्यादी १६ जिल्ह्यांमध्ये हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. औरंगाबाद, जालना आणि यवतमाळमध्ये एक ते दहा रुग्णांची नोंद झाली आहे.

रुग्णांची स्थिती
- २०२० : १२,९०९
- २०२१ : १९,३०३
- २०२२ : १५,४५१
- २०२३ मेपर्यंत : २,५७९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com