‘किलबिलाट रुग्णवाहिनी’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

‘किलबिलाट रुग्णवाहिनी’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, ता. ६ : अनाथांबरोबरच रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना तात्काळ उपचार मिळावेत आणि रुग्णवाहिनीमधील तणावाचे वातावरण दूर व्हावे यासाठी महापालिका आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’ तयार करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज तिचे लोकार्पण करण्यात आले.

सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या कार्यक्रमाला फडणवीस आणि लोढा यांच्यासह आमदार प्रवीण दरेकर व मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल उपस्थित होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तिथे ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’ सेवा सुरू झाली होती. ती आता मुंबईतही सुरू करण्यात आली आहे. लवकरच सेवेचा राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे,’ असे लोढा यांनी सांगितले. ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’त सायरनचा धडकी भरवणारा आवाज किंवा तणावाचे वातावरण नसेल. त्याऐवजी बाळाच्या गोड आवाजाचा सायरन, आत रंगीबेरंगी चित्रे आणि मंद संगीताची सोबत असे आल्हाददायक वातावरण असेल.

महिलेला बाळंतपण वा गर्भारपणाच्या काळात काही त्रास झाल्यास तिला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी किंवा बाळ आजारी असल्यास त्याला नेण्यासाठी रुग्णवाहिनीचा उपयोग होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच रुग्णवाहिन्या रुजू होतील. विनामूल्य असलेली रुग्णवाहिकेची सेवा मुंबईनंतर राज्याच्या अन्य भागांतही सुरू करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com