खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण
खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण

खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवर सेवा वाहिन्या टाकण्यासाठी विविध प्राधिकरणांकडून रस्ते खोदले गेले आहेत. काही ठिकाणी अद्याप कामे सुरू आहेत, तर काही ठिकाणी कामे पूर्ण झाल्यावर खोदलेला भाग खडी टाकून बुजविण्यात आला आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही ठिकठिकाणी खोदलेले रस्ते, मातीचे ढिगारे, खड्डे असे चित्र शहरातील रस्त्यांवर दिसून येत आहे. ही कामे अशीच सुरू राहिल्यास पावसाळ्यात या रस्त्यांची दुरवस्था होईलच, शिवाय वाहतूक कोंडीदेखील होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करून रस्त्यांची स्थिती सुधारावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
कल्याण डोंबिवली शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी काही रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा गटारांची बांधणी सुरू आहे. तसेच काही प्राधिकरणांकडून देखील वाहिन्या टाकण्याचे काम सुरू असून या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत. मुख्य वर्दळीचे रस्ते खोदून काढलेले आहेत. काम झाल्यानंतर हे खड्डे केवळ खडी टाकून बुजविले गेले आहेत; तर रस्त्यावर माती, खडीचा थर तसाच पडून असल्याने रस्ते ओबड धोबड झाले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी ही कामे करुन रस्त्यांची स्थिती बिघडवली जाते असा आरोप सामान्य नागरिकांनी केला आहे. पालिका प्रशासनाचा ही कामे करणाऱ्या कंपन्या, ठेकेदारांवर वचक नसल्याने हे लोक आपले काम करून नंतर रस्ता तसाच सोडून जातात.

वाहन चालवताना अडथळ्यांची शर्यत
खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अनेक अडथळे येतात. वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते. एकीकडे प्रशासनाच्या वतीने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्यांची डागडुजी करताना खोदलेल्या रस्त्यांचीदेखील डागडुजी करण्यात यावी. पावसाची वाट न पाहता पावसाच्या आधी हे काम प्रशासनाने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

ठेकदाराची नियुक्ती
सेवा पुरवठादार कंपन्यांकडून पालिकेकडे दराप्रमाणे देयक भरणा केला जातो. त्याप्रमाणेच कामासाठी परवानगी दिली जाते. पालिकेकडून ठेकेदार नेमून खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण केली जातील, असे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.