पहिल्या दिवशीच ठाण्यात ३०.४५ मिमी पाऊस

पहिल्या दिवशीच ठाण्यात ३०.४५ मिमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : वादळी वाऱ्यापाठोपाठ ठाणे शहरात पावसाचे आगमन झाले आहे. पहिल्या दिवशीच बरसलेल्या पावसाची ठाण्यात ३०.४५ मिमी इतकी नोंद झाली आहे. मंगळवारी रात्री ११.३० ते बुधवारी मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत (दोन तासांत) १४.४७ मिमी पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. मात्र सकाळी सूर्यनारायणाच्या दर्शनाबरोबर तुरळक सरी अधूनमधून पडत होत्या. याचदरम्यान ठाणे शहरात विविध ४० तक्रारींची नोंद झाली असून एका श्वानाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.
ठाणेकर नागरिकांची पावसाची प्रतीक्षा अखेर मंगळवारी संपली. मंगळवारी पाऊस सुरू झाल्यानंतर चोवीस तासांत ३०.४५ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे वित्तहानी झाली नसली तरी शॉक लागून भटक्या श्वानाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळपासून पावसाच्या तुरळक सरी बरसत होत्या. याचदरम्यान ठाणे शहरात ४० तक्रारी नोंदवल्या आहेत. यामध्ये ८ आगीच्या, झाडे कोसळल्याच्या तीन, झाडांच्या फांद्या तुटल्याच्या १३, झाडांची धोकादायक स्थिती झाल्याबाबत २, मेटल शेड पडल्याच्या २ आणि अन्य ११ तक्रारींचा समावेश आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
.....
शहापुरात विजेचा लपंडाव
शहापूर (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून वादळी वारा आणि पावसामुळे शहापूरसह परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. शहापूरलगत असलेल्या आवाळे ग्रामपंचायत हद्दीत वीजवाहक तारा व पोल जीर्ण झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे आवाळे व परिसरातील पाड्यांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विजेच्या लपंडावामुळे ग्रामपंचायत हद्दीतील कराडे, मामनोली, मसमाळ, बोरीचा पाडा, काटेकुई, जांभूळ पाडा, शेकट पाडा आदी २३ गावपाडे अंधारात आहेत. याकडे वीज वितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असून मोबाईलद्वारे संपर्क केल्यास त्याला प्रतिसाद दिला जात नसल्याचा आरोप उपसरपंच प्रदीप आगिवले यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com